राधानगरी तालुक्यात काँग्रेसची एकजूट; सात तारखेला विजयाचा गुलाल लावायला तुमच्यापाशी येऊ – ए. वाय. पाटील

<p>राधानगरी तालुक्यात काँग्रेसची एकजूट; सात तारखेला विजयाचा गुलाल लावायला तुमच्यापाशी येऊ – ए. वाय. पाटील</p>

कोल्हापूर : राधानगरी तालुक्यातील विखुरलेली काँग्रेस आता पूर्णपणे एकसंघ झाली असून येत्या सात तारखेला सर्वच्या सर्व उमेदवार निवडून आणून विजयाचा गुलाल लावायला तुमच्यापाशी येऊ, असा ठाम विश्वास काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ए. वाय. पाटील यांनी व्यक्त केला. कोल्हापूर जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राधानगरी आणि करवीर तालुक्यातील काँग्रेसच्या प्रमुख पदाधिकारी व उमेदवारांचा अजिंक्यतारा येथे झालेल्या मेळाव्यात ते बोलत होते.

या मेळाव्यात विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी मार्गदर्शन करताना स्वर्गीय पी. एन. पाटील यांनी काँग्रेस जिवंत ठेवण्यासाठी दिलेल्या संघर्षाची आठवण करून दिली. काँग्रेस आजही जिवंत असून लोकांच्या मनात काँग्रेस आहे. मात्र कार्यकर्त्यांनी थेट लोकांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. लोकांना सक्षम आणि विश्वासार्ह पर्याय हवा असून काँग्रेसच तो पर्याय असल्याचं त्यांनी ठामपणे सांगितलं. राधानगरी तालुका हा काँग्रेसच्या विचारांचा पाईक असून तो पुन्हा एकसंघ होत असल्याचा आनंदही त्यांनी व्यक्त केला.

ज्येष्ठ नेते ए. वाय. पाटील यांनी सांगितलं की, कोल्हापूर जिल्हा आणि शहर नेहमीच काँग्रेसच्या विचारांसोबत खंबीरपणे उभं राहिलं आहे. आमदार सतेज पाटील यांनी एकहाती लढा देत कोल्हापूर महापालिकेत काँग्रेसला यश मिळवून दिलं आणि कोल्हापूर तुमच्या पाठीशी हिमालयासारखा उभा आहे, हे संपूर्ण महाराष्ट्राला दाखवून दिलं. चाळीस वर्षांनंतर राधानगरी तालुक्यातील काँग्रेस पूर्णपणे एकत्र आली असून हातात हात घालून तालुक्याची घडी बसवण्याचा निर्धार करण्यात आला आहे. या एकतेला कोणतीही दृष्ट लागू देणार नाही, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

माजी गोकुळचे संचालक पी. डी. धुंदरे यांनी, आयुष्यभर काँग्रेससोबत काम केल्याचं सांगत काही काळ परिस्थितीमुळे वेगळं जावं लागलं असलं तरी आता पुन्हा सर्वजण एकत्र आल्याचा आनंद व्यक्त केला. या एकजुटीचा फायदा निवडणुकीत निश्चितच होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

यावेळी सदाशिव चरापले यांनी काँग्रेसमधील घरवापसीबाबत आनंद व्यक्त करत, एकाकी लढा देत कोल्हापूर महापालिकेत काँग्रेसला यश मिळवून दिल्याबद्दल आमदार सतेज पाटील यांचं अभिनंदन केलं. यावेळी आमदार सतेज पाटील यांचा सत्कारही करण्यात आला.

या मेळाव्यास आमदार जयंत आसंगावकर, माजी गोकुळ संचालक पी. डी. धुंदरे, तालुकाध्यक्ष हिंदुराव चौगुले, माजी जिल्हा परिषद सदस्य अभिजीत तायशेटे, विश्वनाथ पाटील, ए. डी. चौगुले, कृष्णा बापू पाटील, धीरज डोंगरे, सुभाष पाटील, दीपक पाटील, मानसिंग पाटील, बाजीराव चौगुले, मोहन धुंदरे, मोहन पाटील, रवींद्र पाटील, विलास हळदे, नंदुभाऊ पाटील यांच्यासह राधानगरी व करवीर तालुक्यातील काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.