वनविभागाच्या अथक प्रयत्नानं आई अन् पिल्ल्यांचं झालं पुनर्मिलन...

<p>वनविभागाच्या अथक प्रयत्नानं आई अन् पिल्ल्यांचं झालं पुनर्मिलन...</p>

कोल्हापूर – हातकणंगले तालुक्यातील हेर्ले येथील निलेश कोळेकर यांच्या शेतामध्ये ऊस तोडणी सुरु असताना दुर्मिळ समजल्या जाणाऱ्या वाघाटी या रान मांजराची दोन पिल्ले आढळून आली. त्यानंतर  वनविभागाचे वन्यजीव बचाव पथक त्या ठिकाणी तात्काळ दाखल झाले. 


प्रथमदर्शनी ती पिल्ले खूपच लहान असल्याकारणाने त्यांचे व त्यांच्या आईचे पुनर्मिलन घडवून आणण्याचे वन्यजीव बचाव पथकाने ठरवले आणि त्यानुसार ती पिल्ले त्याच ठिकाणी ठेवून त्यांच्यावर सीसीटीव्ही कॅमेरा द्वारे  नजर ठेवण्यात आली.  दिनांक 21 डिसेंबर रोजी संपूर्ण रात्र आईची वाट पाहण्यात आली. परंतु त्यांची आई आली नाही पण वनविभागाने हार न मानता  दुसऱ्या दिवशी परत त्याच ठिकाणी दोन्ही पिल्ले ठेवली रात्री साडे सात  वाजण्याच्या सुमारास  त्या पिल्ल्यांची आई आली आणि  पहिल्या पिल्लाला सुरक्षित ठिकाणी घेऊन गेली. त्यानंतर रात्री 10.30 चा दरम्यान परत आई येऊन दुसऱ्या पिल्लालाही सुरक्षित ठिकाणी घेऊन गेली. अशा तऱ्हेने आईपासून वेगळी झालेली ती वाघाटीची दोन्हीही पिल्ले सुखरूपपणे त्या आईपाशी पाठवण्यात वन विभागाला यश आले आहे. 

हे संपूर्ण बचाव कार्य कोल्हापूर वनविभागाचे उपवनसंरक्षक धैर्यशील पाटील, करवीर वनपरिक्षेत्र अधिकारी नंदकुमार नलावडे यांच्या मार्गदर्शनाखाली वन्यजीव बचाव पथकाचे प्रदीप सुतार, अमोल चव्हाण, अलमतीन बांगी, विनायक माळी आणि वनरक्षक प्रदीप जोशी यांनी पार पाडले.