चंदगड तालुक्यातील साखर कारखान्यांकडून उसाला ३४०० रुपये दर

<p>चंदगड तालुक्यातील साखर कारखान्यांकडून उसाला ३४०० रुपये दर</p>

चंदगड : चंदगड विधानसभा मतदारसंघातील अतिवृष्टी, जंगली प्राण्यांचे वाढते हल्ले, तसेच खत व शेतीखर्चातील प्रचंड वाढ यामुळे अडचणीत सापडलेल्या ऊस उत्पादकांना दिलासा देणारा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. ओलम, दौलत आणि इको केन या तालुक्यातील सर्व साखर कारखान्यांनी ऊसाला प्रति टन ३४०० रुपये दर देण्यास एकमुखी सहमती दर्शवली आहे. 


शुक्रवारी रात्री आमदार शिवाजी पाटील यांच्या निवासस्थानी कारखाना चालक–मालक, शेतकरी प्रतिनिधी आणि अधिकारी यांची बैठक झाली. शेतकऱ्यांच्या वतीने आमदार पाटील यांनी ३६०० रुपये दराची किमान मागणी ठामपणे मांडली. इतर जिल्ह्यातील काही कारखाने हा दर देत असल्याचे शेतकऱ्यांनी निदर्शनास आणून दिले. मात्र, वाहतूक अंतर, टोळीव्यवस्था, हंगामातील विलंब, दौलत कारखान्यातील कामगार संप, तसेच तांत्रिक समस्यांचे कारण देत कारखाना चालकांनी ३६०० रुपये दर देणे अशक्य असल्याचे सांगितले. त्यांनी सुरुवातीला ३३०० रुपयांचा प्रस्ताव मांडला; मात्र तो शेतकऱ्यांनी नाकारला. यामुळे ही बैठक मध्यरात्री उशिरापर्यंत चालली आणि अखेर ३४०० रुपयांवर सर्वांचे एकमत झाले.

या बैठकीस अथर्व दौलत कारखान्याचे चेअरमन मानसिंग खोराटे, इको केनचे बाबासाहेब देसाई, ओलमचे युनिट हेड संतोष देसाई, महेश भोसले, विजय मराठे, अश्रू लाड, दीपक पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती भावकू गुरव यांच्यासह अनेक प्रमुख शेतकरी उपस्थित होते.