कृषी निविष्ठा विक्रेत्यांच्या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद...साथी पोर्टलला विरोध
कोल्हापूर - शेतकऱ्यांना दर्जेदार खते, बी बियाणे आणि कीटकनाशकांचा पुरवठा करण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने पॉस मशीनच्या धर्तीवर साथी पोर्टलचे बंधन घातले आहे. मात्र याला राज्यातील ग्रामीण भागातील कृषी निविष्ठा विक्रेत्यांनी विरोध केला आहे. हे पोर्टल विक्री करणाऱ्या शेती सेवा केंद्र आणि दुकानदारांवर लागू केल्यास आधीच कमी मार्जिनवर काम करणाऱ्या कृषी सेवा चालकांवर आणखी आर्थिक बोजा पडणार आहे. या पोर्टलच्या सक्तीमुळे कृषी सेवा दुकाने बंद पडतील, अशी भीती व्यक्त करत हे पोर्टल सरकारने रेटण्याचा प्रयत्न केल्यास उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा राधानगरी तालुका खते, बियाने, कीटकनाशके विक्रेता संघटनेचे अध्यक्ष नामदेव पाटील यांनी दिला आहे.
आजच्या बंदला जिल्हयात चांगला प्रतिसाद मिळाला आहे. सर्वच कृषी सेवा चालकांनी बंद पाळल्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागले आहे.