पूरग्रस्तांना गोकुळकडून ३२०० लिटर दुधाचे वाटप...
सोलापूर जिल्ह्यातील पूरग्रस्तांना गोकुळचा मदतीचा हात

कोल्हापूर - सोलापूर जिल्ह्याला पावसाने अक्षरशः झोडपून काढले आहे. पावसामुळे जिल्ह्यातील दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर, मोहोळ आणि माढा तालुक्यातील अनेक गावे पाण्याखाली गेली असून, पशुधन, घरे, दुकाने, फळबागा आणि पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
पुरामुळे नागरिकाचे मोठे नुकसान झाल्याने पूरग्रस्त नागरिकांसाठी गोकुळने मदतीचा हात पुढे केला आहे. पुरग्रस्तांनी स्थलांतरित केलेल्या छावण्यांमध्ये जाऊन गोकुळच्यावतीने ३२०० लिटर दुधाचे वाटप करण्यात आले आहे. संघाच्यावतीने केवळ सामाजिक बांधिलकी म्हणून हा उपक्रम राबवण्यात आला असून गरजूंच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे हे आपले कर्तव्य असल्याचे गोकुळचे चेअरमन नविद मुश्रीफ यांनी सांगितले. दक्षिण सोलापूरचे तहसीलदार अभिजीत नरवडे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि शासकीय अधिकारी यांच्या उपस्थितीत हे वाटप पार पडले.
यावेळी ब्रह्मदेव माने, शिक्षण संकुलाचे संचालक पृथ्वीराज माने, गोवर्धन जगताप, राम जाधव, सरपंच संजय गायकवाड, उपसरपंच मधुकर कांबळे, शेतकरी हरिदास जमादार, विठ्ठल घंटे, बालाजी घंटे, प्रशासकीय अधिकारी नासिर पठाण, पुरवठा व निरीक्षण अधिकारी निखिल महानोर, सोलापूर गोकुळ डिस्ट्रीब्यूटर रवी मोहिते, संग्राम सुरवसे, मोहन चोपडे, निलांजन चेळेकर आदि उपस्थित होते.