स्वाभिमानी शेतकरी संघटनेची २४ वी ऐतिहासिक ऊस परिषद ‘या’ दिवशी होणार

जयसिंगपूर - स्वाभिमानी शेतकरी संघटनेची २४ वी ऊस परिषद येत्या गुरूवारी १६ ऑक्टोबर २०२५ रोजी जयसिंगपूर येथील विक्रमसिंह क्रीडांगणावर पार पडणार असल्याची माहिती मा. खासदार राजू शेट्टी यांनी कल्पवृक्ष गार्डन येथे पार पडलेल्या कार्यकर्ता मेळाव्यात दिली.
या वेळी माजी खासदार राजू शेट्टी म्हणाले की, "गेल्या पाच वर्षांपासून ऊस दरात वाढ झाली असली, तरी शेतकऱ्यांना त्याचा प्रत्यक्ष लाभ मिळालेला नाही. खते, बियाणे, कीटकनाशके, मजुरी, मशागत, तोडणी व वाहतूक या सर्व खर्चांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. मात्र साखर कारखानदार ऊस उत्पादकांना केवळ ₹२८०० ते ₹३००० इतकाच दर देत आहेत. नवीन साखर कारखान्यांना परवाने देणे बंद केले असताना, विद्यमान कारखान्यांचे गाळप परवाने तिप्पट-चौपटीने वाढवले गेले आहेत. साखर कारखानदार, राज्य सरकार आणि साखर संघ मिळून एफ.आर.पी. मोडून टप्प्याटप्प्याने पैसे देण्याचा डाव रचत आहेत. राज्याच्या उच्च न्यायालयात शेतकऱ्यांनी एकरकमी एफ.आर.पी. बाबत लढाई जिंकली असली, तरी सरकार आणि साखर संघ सर्वोच्च न्यायालयात याचा विरोध करत आहेत. शेतकऱ्यांना कायदेशीर अडचणीत अडकवण्याचा कट सुरू असून, या विरोधात आता संघटित लढा देण्याची वेळ आली आहे असे सांगितले. रिकव्हरी चोरी, काटामारी व वाढते उत्पादन खर्च यावरही त्यांनी चिंता व्यक्त करत शेतकरी सध्या नैसर्गिक आपत्ती, महापूर, अतिवृष्टी अशा संकटांमुळे पूर्णपणे संकटात सापडला आहे, असे स्पष्ट केले.
२४ व्या ऊस परिषदेनिमित्त सांगली, कोल्हापूर, सोलापूर, सातारा आणि उत्तर कर्नाटक येथे शेतकरी मेळावे घेण्यात येणार आहेत.
या मेळाव्यास जिल्हाध्यक्ष अजित पोवार, धनाजी पाटील, राजाराम देसाई, विठ्ठल मोरे, राजेंद्र गड्यान्नावर, आण्णासो चौगुले, बाळासाहेब पाटील, वसंत पाटील, जयकुमार कोले, महेश खराडे यांच्यासह सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.