राधानगरी तालुक्यात ‘तालुकास्तरीय रानभाजी महोत्सव’ उत्साहात संपन्न

राधानगरी – महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या वतीने ‘तालुकास्तरीय रानभाजी महोत्सव’ आज तारळे खुर्द येथील श्री साई सांस्कृतिक भवन येथे मोठ्या उत्साहात पार पडला. नैसर्गिकरीत्या उगवणाऱ्या रानभाज्यांचे पोषणमूल्य, औषधी गुणधर्म आणि आरोग्यविषयक महत्त्व जनतेपर्यंत पोहोचवणे, स्थानिक उत्पादन विक्रीतून शेतकरी व महिला बचत गटांना आर्थिक लाभ मिळवून देणे हा महोत्सवाचा मुख्य हेतू होता. सकाळी १० वाजता सुरू झालेल्या या महोत्सवाच्या अध्यक्षस्थानी राज्यस्तरीय शेतकरी सल्ला समितीचे सदस्य अशोक फराकटे होते.
सुरवातीला जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी जालिंदर पांगरे यांनी प्रस्तावनेमध्ये महोत्सवाची माहिती दिली. राज्य समन्वयक आनंदा शिंदे यांनी रानभाज्यांचे महत्त्व अधोरेखित केले, तर अखिल भारतीय समन्वित नाचणी व तत्सम तृणधान्य संशोधन प्रकल्पाचे प्रमुख डॉ. योगेश बन यांनी तृणधान्यांचे पोषणमूल्य व आरोग्यदायी फायदे शेतकऱ्यांसमोर मांडले.
महोत्सवात रानभाजी प्रदर्शन, रानभाजी पाककला स्पर्धा आणि रानभाजी विक्री व्यवस्था या उपक्रमांचा समावेश होता. रानभाजी प्रदर्शनात तालुक्यातील ४७ महिला व शेतकरी गटांनी सहभाग घेतला होता. यामध्ये उंबर, नाल, कुर्जा, शेवगा, हादगा, वाघाडी, काटेमाठ, मोहोर, टाकळी आदी ४२ प्रकारच्या रानभाज्यांचे दर्शन घडले.
पाककला स्पर्धेत महिलांचा उत्स्फूर्त सहभाग -
रानभाजी पाककला स्पर्धेमध्ये ६४ महिला व गटांनी सहभाग नोंदवून १२८ प्रकारच्या पारंपरिक आणि नावीन्यपूर्ण पाककृती सादर केल्या. पाककलेत महिलांनी पारितोषिके पटकावली.
प्रथम क्रमांक – श्रीमती शिल्पा संतोष पाटील
द्वितीय क्रमांक – श्रीमती सायली शंकर सारंग
तृतीय क्रमांक – श्रीमती शितल केरबा शेलार
उत्तेजनार्थ – श्रीमती प्रज्ञा निलेश पाटील व श्रीमती सारिका श्रीकांत यादव
शेती योजनांचे वितरण व लाभ -
महोत्सवात राज्य पुरस्कृत यांत्रिकीकरण योजनेतून लाभार्थ्यांना ट्रॅक्टर व पावर ट्रेलर चे वितरण करण्यात आले. तसेच, मनरेगा अंतर्गत ऊसाच्या बांधावर नारळ लागवड उपक्रमातील शेतकऱ्यांना नारळ रोपांची वाटप करण्यात आली. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सानुग्रह योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना प्रमाणपत्रे देण्यात आली. तालुका कृषी अधिकारी एकनाथ गुरव यांनी उपस्थितांचे आभार मानले. यावेळी शेतकरी सल्ला समिती सदस्य, विविध गावांचे सरपंच, कृषी अधिकारी व कर्मचारी, महिला बचत गट, शेतकरी आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.