महावितरणचा भोंगळ कारभार : पंचगंगा नदी काठावरील मोटर्स जळाल्या...
कोल्हापूर - पाणीपुरवठा तसेच शेती पंपांच्या विद्युत पुरवठा करणाऱ्या ट्रान्सफॉर्मर मधून विद्युत प्रवाह वाढल्याने पंचगंगा नदी काठावरील अनेक मोटर्स जळाल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांसह ग्रामपंचायत, पाणीपुरवठा संस्थांचे लाखोचे नुकसान झाले आहे. या प्रकारामुळे महावितरणचा भोंगळ कारभार समोर आला आहे.
करवीर तालुक्यातील शिये येथील पंचगंगा नदी वरून या परिसरात असणाऱ्या शिये, टोप, शिरोली पुलाची, दक्षिणवाडी, संभापूर या परिसराला पाणी उपसा केला जातो. नदी काठावर या सर्व ग्रामपंचायतींचे जॅकवेल आहेत. तसेच शेतीसाठी पाणी उपसा करण्यासाठी शेती पंप आहेत. या पाणी उपसा करणाऱ्या विद्युत डीपी वरून उच्चदाबाचा विद्युत पुरवठा ट्रान्सफॉर्मर केला जातो. बुधवारी रात्री अचानक ट्रान्सफॉर्मरवर विद्युत प्रवाहाचा लोढ आल्याने सर्व ठिकाणीचे पाणी उपसा मोटर्स जळाल्या आहेत. तसेच नेजदार,शिंदे,पाटील, आंबी या शेतकऱ्याचे विहारी तसेच नदी काठावरील पंप जळाल्या आहेत. सातत्याने होणाऱ्या अशा नुकसानीला महावितरण जबाबदार असून ते ही जबाबदारी झटकत आहेत. ऊस लावण करण्यापूर्वीच असा प्रकार घडल्यामुळे शेतकऱ्यांना नुकसानीला सामोरे जाव लागत आहे. याचबरोबर नदीकाठच्या अनेक गावांना पाणीपुरवठाही गेली चार दिवस बंद आहे. महावितरणने याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.