उंचगाव, गडमुडशिंगीमधील शेती पंपांना दिवसा वीज मिळावी : ठाकरे गटाची मागणी
कोल्हापूर - करवीर तालुक्यातील उंचगावसह, गडमुडशिंगी मधील शेती पंपांसाठी रात्री वीज पुरवठा केला जातो. सध्या कडाक्याची थंडी असल्याने आणि वन्यप्राण्यांचा धोका असल्याने शेतकऱ्यांना रात्रीच्या वेळी बाहेर पडणे मुश्किल झाले आहे. त्यामुळे शेती पंपासाठी दिवसा वीजपुरवठा उपलब्ध करुन द्यावा, अशी मागणी करवीर तालुका शिवसेना ठाकरे गटाच्यावतीने करण्यात आली आहे. मागणी मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन छेडू, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
महावितरणच्या हुपरी कार्यालयाकडील प्रभारी उपकार्यकारी अभियंता संदीप काकडे, सहाय्यक अभियंता सचिन काटकर यांना याबाबतचे निवेदन देण्यात आले आहे. महावितरणच्या अधिकाऱ्यांनी याबाबत वरिष्ठ कार्यालयाला प्रस्ताव पाठवण्याचे आश्वासन दिले.
यावेळी पक्षाचे करवीर तालुका प्रमुख राजू यादव, उपजिल्हा प्रमुख पोपट दांगट, उपजिल्हा समन्वयक विक्रम चौगुले, दीपक पाटील, सुनील चौगुले, बाळासाहेब नलवडे, दत्ता फराकटे, अक्षय परीट, रामराव पाटील, सुरज इंगवले, राजू राठोड, सचिन नागटिळक, प्रमोद शिंदे, अजित पाटील, केरबा माने आदी उपस्थित होते.