टीईटी सक्ती विरोधात शिक्षक रस्त्यावर...

 

 

शिक्षकांचा कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा...

<p>टीईटी सक्ती विरोधात शिक्षक रस्त्यावर...</p>

<p> </p>

<p> </p>

कोल्हापूर  - राष्ट्रीय शैक्षणिक हक्क कायदा, आरटीई अॅक्ट लागू झाल्यानंतर २३ ऑगस्ट २०१० रोजी नॅशनल कौन्सिल फॉर टीचर एज्युकेशनने शिक्षक भरतीसाठी किमान पात्रता जाहीर केली. या नियमानुसार २०१० नंतर नियुक्त केल्या जाणाऱ्या शिक्षकांना डीएड, बीएड आणि टीईटी ही पात्रता ठरवण्यात आली. महाराष्ट्र शासनाने १३ फेब्रुवारी २०१२ पासून टीईटीची सक्ती केलीय. त्यामुळे यापूर्वी नियुक्त केलेल्या शिक्षकांना टीईटीची सक्ती लागू होत नाही. मात्र सर्वोच्च न्यायालयाने निकाल देत सर्व शिक्षकांना टीईटी अनिवार्य केलीय. त्यामुळे टीईटी सक्ती रद्द करावी, यासह अन्य मागण्यांसाठी कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठाच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यामध्ये हजारोंच्या संख्येने शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी सहभागी झाले होते.

शिक्षक आमदार जयंत आसगावकर, शैक्षणिक व्यासपीठाचे अध्यक्ष एस. डी. लाड यांच्या नेतृत्वाखाली दसरा चौकातून या मोर्चाला सुरुवात झाली. रद्द करा रद्द करा टीईटीची सक्ती रद्द करा. बोलो रे बोलो हल्ला बोलो. अशा जोरदार घोषणा देत शिक्षक या मोर्चात सहभागी झाले होते. हा मोर्चा व्हीनस कॉर्नर, बसंत बहार रोड मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ आल्यानंतर मोर्चाचे सभेत रुपांतर झाले. सभेत शिक्षक नेत्यांनी मनोगते व्यक्त करत केंद्र आणि राज्य शासनावर कडाडून टीका केली. यावेळी आमदार जयंत आसगावकर, राज्य खाजगी प्राथमिक शिक्षक सेवक समितीचे राज्याध्यक्ष भरत रसाळे आणि इतर प्रमुख शिक्षक नेत्यांनी रस्त्यावर ठिय्या मारत प्रशासनाचा निषेध केला. या नंतर जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना निवेदन देण्यासाठी जाताना शिक्षकांनी गेट मधून आत घुसण्याचा प्रयत्न केल्याने शिक्षक आणि पोलीसांमध्ये झटापट झाली.

 अखेर पंधरा शिक्षकांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले. या निवेदनात राज्य सरकारने तात्काळ सर्वोच्च न्यायालयात रिट पिटीशन दाखल करावी. आरटीई कायद्याच्या कलम २३ मध्ये सुधारणा करून सन २०१३ पूर्वी नियुक्त शिक्षकांना टीईटी सक्ती रद्द करावी. १५ मार्च २०२४ चा महाराष्ट्र शासनाने काढलेला अन्यायकारक संच मान्यतेचा आदेश रद्द करावा. सर्व शिक्षकांना आणि शिक्षकेत्तर सेवकांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, अशा मागण्या करण्यात आल्यात.

या मोर्चात शिक्षक नेते दादासाहेब लाड, भरत रसाळे, भैया माने, राजेंद्र कोरे, संतोष आयरे, खंडेराव जगदाळे, सुधाकर सावंत, प्रमोद तोंदकर, उमेश देसाई, प्रसाद पाटील, रवीकुमार पाटील, एस व्ही पाटील, बबन केकरे, राजेश वरक यांच्यासह विविध शिक्षक संघटनांचे पदाधिकारी, सदस्य, शिक्षक, शिक्षकेत्तर कमर्चारी सहभागी झाले होते.