ज्येष्ठ नागरिकांची 'महालक्ष्मीच्या दारी सन्मान वारी' पोलिसांनी रोखली...
ज्येष्ठ नागरिक आक्रमक
कोल्हापूर - महाराष्ट्र शासनाकडून ज्येष्ठ नागरिकांना दरमहा सात हजार रुपये सन्मानधन देण्याचा निर्णय जाहीर करण्यात आलाय. मात्र त्याची अद्यापही अंमलबजावणी झालेली नाही. या निर्णयाची अंमलबजावणी व्हावी, यासाठी आज अर्थक्रांती जीवन गौरव अभियान आणि महालक्ष्मी ज्येष्ठ नागरिक जागृती मंच यांच्या वतीने 'महालक्ष्मीच्या दारी, सन्मान वारी' चे आयोजन करण्यात आले होते. सकाळी साडे अकरा वाजता गांधी मैदान येथून या वारीला सुरुवात झाली.
ज्येष्ठ नागरिकांच्या मासिक पेन्शन सन्मानधनसाठी सर्व ज्येष्ठ नागरिक पारंपारिक वेशभूषा परिधान करून हातात फलक, टाळ, मृदुंगाच्या गजरात सन्मान वारीत सहभागी झाले होते. पन्नास हजार ज्येष्ठ नागरिकांच्या स्वाक्षरींचे पत्र घेवून ही वारी गांधी मैदान ते खरी कॉर्नर, बिन खांबी गणेश मंदिर, महाद्वार रोड मार्गे ही वारी अंबाबाई मंदिरात येणार होती. मात्र स्वाक्षरींचे पत्र अंबाबाई चरणी अर्पण करण्याआधीच ही वारी पोलिसांनी खरी कॉर्नर येथे रोखली. यावेळी आक्रमक झालेल्या ज्येष्ठ नागरिकांनी, राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी न केल्यास मुंबईतील आझाद मैदानात आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
यावेळी जगन्नाथ मोरे पाटील, ह. भ. प. महादेव यादव महाराज, आनंद वायदंडे, पी. के. पाटील, बाबुराव कोळेकर, राणी गायकवाड यांच्यासह अनेक ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते.