आजरा–चंदगड–गडहिंग्लजातील कारखान्यांविरोधात शेतकरी संतप्त; ओलम शुगर राजगोळी खुर्द येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे बेमुदत आंदोलन
सांगली–कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी ऊसाचा ३५००रुपये प्रति टन दर जाहीर केलेला असताना, आजरा, चंदगड व गडहिंग्लज तालुक्यातील काही कारखान्यांनी ३४०० रुपये प्रति टन दर जाहीर केल्याने ऊस उत्पादक शेतकरी संतप्त झाले आहेत. या दरकपातीमागे भाजपचे आमदार शिवाजीराव पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेवरून दबाव टाकल्याचा आरोप शेतकरी संघटनांकडून होत आहे.
दरकपातीविरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने ओलम शुगर, राजगोळी खुर्द येथे बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. सोमवारी सायंकाळी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला आणि आंदोलन अधिक तीव्र करण्याचे संकेत दिले.
शेतकऱ्यांनी सकाळपासून गळीत हंगाम बंद पाडत कारखाना परिसरातच ठिय्या आंदोलन सुरू ठेवले आहे. जिल्ह्यातील इतर कारखान्यांप्रमाणे ३५०० रुपये दर मिळाल्याशिवाय गळीत सुरू न करण्याचा निर्णय शेतकऱ्यांनी घेतला आहे. आंदोलन तीव्र होण्याची शक्यता ओळखून संबंधित कारखान्यांवर कडक पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
दरकपातीमुळे शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी असून, “आमदार शिवाजीराव पाटील कारखानदारांना संघटित करून शेतकऱ्यांच्या विरोधात भूमिका घेत आहेत” अशी प्रतिक्रिया शेतकरी व्यक्त करत आहेत. याशिवाय, ऊस उत्पादकांना एफआरपी तीन टप्यात देण्यासाठी राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात गेले असल्याने नाराजी आणखी तीव्र झाली आहे.
स्थानिक शेतकऱ्यांचा ठाम निर्धार कायम असून, “दरवाढ होईपर्यंत आंदोलन थांबवणार नाही,” अशी भूमिका त्यांनी स्पष्ट केली आहे.