३७५१ रुपयांची पहिली उचल मिळवून देण्यासाठी स्वाभिमानींचे ऊस आंदोलन तीव्र करा
राजू शेट्टींची कर्नाटक सीमाभागातील शेतकऱ्यांना आर्त हाक
बेळगाव : कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांबरोबरच कर्नाटक सीमाभागातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना प्रति टन ३७५१ रु. ची पहिली उचल मिळवून देण्यासाठी आंदोलनाची तीव्रता आणखी वाढवावी, असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी केले. बेळगाव जिल्ह्यातील गुरलापूर येथे सुरू असलेल्या ऊस आंदोलनात ते बोलत होते.
गेल्या आठवड्यापासून कर्नाटक सीमाभागात आंदोलनाला अधिक उग्र रूप आले आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी चालू गळीत हंगामासाठी प्रति टन ३७५१ रु. ची पहिली उचल आणि गत हंगामातील तुटलेल्या ऊसासाठी २०० रु. दुसरा हप्ता मिळाल्याशिवाय कारखाने सुरू न करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.
शेट्टी म्हणाले की, कोल्हापूर, सांगली आणि कर्नाटक सीमाभागातील साखर कारखानदार कटिंग व रिकव्हरीमध्ये मोठ्या प्रमाणावर काटामारी करीत आहेत. कारखानदारांनी कोल्हापूर जिल्ह्यासाठी ३४०० रु. आणि कर्नाटकातील बेळगाव व बागलकोट जिल्ह्यांसाठी ३००० रु. इतक्या पहिल्या उचल दरावर ठाम भूमिका घेतली आहे. मात्र, ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी अभूतपूर्व एकी दाखवत साखर कारखान्यांकडे ऊस वाहतूक रोखून धरली आहे.
दरम्यान, कोल्हापूर जिल्ह्यातील काही साखर कारखानदार कर्नाटकातील ८० ते ९० किलोमीटर अंतरावरून ऊस आणण्याचा प्रयत्न करीत आहेत. जवाहर साखर कारखान्याने ९० किमी अंतरावरून ऊस आणणाऱ्या शेतकऱ्यांना ३४०० रु. दर देण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे कारखान्याला प्रति टन सुमारे ११०० रु. तोडणी व वाहतूक खर्च येणार आहे. यावरूनच स्वाभिमानी शेतकरी संघटनेची प्रति टन ३७५१ रु. ची पहिली उचल मागणी योग्य असल्याचे राजू शेट्टी यांनी सांगितले.