कंत्राटदार धार्जिणा शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात सावंतवाडीत परिषद

<p>कंत्राटदार धार्जिणा शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात सावंतवाडीत परिषद</p>

सावंतवाडी – प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यावरण, जैवविविधता आणि शेतकरी यांच्या हितावर होणाऱ्या परिणामाच्या निषेधार्थ शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीतर्फे येत्या ४ नोव्हेंबर रोजी सकाळी १०.३० वाजता सावंतवाडी येथील काझी शहाबुद्दीन हॉलमध्ये परिषद आयोजित करण्यात आली आहे. जिल्ह्यातील बाधित गावे, शेतकरी, सामाजिक संघटना तसेच विविध राजकीय पक्ष या परिषदेत सहभागी होणार आहेत. या परिषदेला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी, विधानपरिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज (बंटी) पाटील, संघर्ष समितीचे राज्य समन्वयक गिरीश फोंडे, आमदार वैभव नाईक, संपत पाटील, आणि राजेंद्र गाड्यानवार हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. अशी माहिती जिल्हा निमंत्रक डॉ. जयंत परुळेकर आणि सह-निमंत्रक सतीश लळीत यांनी दिली आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गेळे–आंबोली–घारपी उडेली–असनीये–तांबोळी–डेगवे–बांदा या सुमारे ३८ किमी लांबीच्या मार्गावर हा महामार्ग प्रस्तावित आहे. हा परिसर इको सेन्सिटिव्ह झोन असल्याने मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड, जैवविविधतेचा ऱ्हास, तसेच नैसर्गिक पाण्याच्या स्रोतांवर परिणाम होण्याची भीती स्थानिकांनी व्यक्त केली आहे. यामुळे पिण्याचे व शेतीसाठी लागणारे पाणीटंचाईचे प्रश्न निर्माण होऊ शकतात, तर जंगलतोडीमुळे जंगली प्राण्यांचा उपद्रव वाढण्याची शक्यता आहे. फुकेरी गावातील शिवकालीन हनुमंत गडाचा काही भाग या प्रकल्पासाठी उध्वस्त होणार असल्याचीही माहिती देण्यात आली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा तालुक्यातून आंबोली–गेळे मार्गे बांदा येथे येणाऱ्या या हायस्पीड महामार्गाला कुठेही एक्झिट अथवा एंट्री नसल्याने परिसरातील तेरा गावांना याचा कोणताही थेट फायदा होणार नाही, असा आरोप करण्यात आला आहे. १९५५ च्या हायवे जमीन अधिग्रहण कायद्याअंतर्गत शेतकऱ्यांच्या जमिनी कमी मोबदल्यात घेतल्या जाण्याचा धोका असल्याने शेतकरी वर्गात नाराजी व्यक्त होत आहे. स्थानिकांच्या मते, हा महामार्ग शेतकरी वा ग्रामस्थांच्या विकासासाठी नसून गोवा मार्गे जाणाऱ्या श्रीमंत पर्यटकांसाठी आणि विदर्भातील खनिज वाहतुकीसाठी राबविण्यात येत आहे.

या परिषदेबाबतची माहिती माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर, प्रभारी जिल्हा काँग्रेसचे आबा दळवी, जिल्हा काँग्रेस अध्यक्ष विलास गावडे, माजी जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख बाबुराव धुरी, ॲड. नार्वेकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे पुंडलिक दळवी, प्रसाद पावसकर, तसेच डॉ. जयेंद्र परुळेकर (निमंत्रक) आणि सतीश लळीत (सह-निमंत्रक) यांनी दिली आहे.