दिवाळी बोनस कमी मिळाल्यानं कर्मचाऱ्यांचं टोल गेट ओपन आंदोलन; कंपनीला लाखोंचं नुकसान

उत्तर प्रदेश - उत्तर प्रदेशातील फतेहाबादमधील एका टोल प्लाझावरील कर्मचाऱ्यांना दिवाळीचा बोनस कमी मिळाल्यानं कर्मचाऱ्यांनी संताप व्यक्त केलाय. कर्मचाऱ्यांनी टोल गेट ओपन ठेवल्यानं हजारो गाड्या शुल्काशिवाय गेल्या. त्यामुळं कंपनीला लाखोंचा तोटा झालाय. ही घटना फतेहाबाद, आग्रा-लखनऊ एक्सप्रेसवेवरील टोल प्लाझावर घडली.
या टोल प्लाझावरील कर्मचाऱ्यांना मागील वर्षी त्यांनी 5,000 बोनस दिला होता. यावर्षी केवळ 1,100 चा बोनस मिळाला. त्यामुळं कर्मचाऱ्यांच्या नाराजीचा उद्रेक झाला. व्यवस्थापनाकडं तक्रार करूनही कोणतीही सकारात्मक प्रतिक्रिया मिळाली नाही. संतप्त कर्मचाऱ्यांनी टोल गेट उघडे ठेवले आणि टोल वसुली पूर्णतः बंद ठेवली. तब्बल २ तास टोल वसुली थांबली आणि जवळपास ५,००० हून अधिक गाड्या टोल न भरताच निघून गेल्या. त्यामुळं कंपनीचं २५ ते ३० लाख रुपयांचं नुकसान झाल्याचं सांगण्यात येतं. पोलिसांना घटनास्थळी बोलवण्यात आलं. व्यवस्थापन आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. अखेरीस कर्मचाऱ्यांना १०% पगारवाढ देण्याचं आश्वासन देण्यात आलं त्यानंतर आंदोलन मागं घेतलं.