डॉ. सोनम वांगचुक यांच्या अटकेच्या निषेधार्थ कोल्हापुरात इंडिया आघाडीचा भव्य मोर्चा...
डॉ. सोनम वांगचुक यांच्या सुटकेसाठी इंडिया आघाडीचा मोर्चा

कोल्हापूर - निवडणुकीपूर्वी भाजपने दिलेल्या जाहीरनाम्यातील आश्वासनाप्रमाणे लेह लडाखला स्वतंत्र राज्याचा दर्जा द्यावा, या मागणीसाठी शिक्षण आणि पर्यावरण तज्ञ डॉक्टर सोनम वांगचुक यांनी लोकशाही मार्गाने आंदोलन सुरू केले होते.
मात्र केंद्र सरकारने २६ सप्टेंबरला त्यांना देशद्रोहाच्या गुन्ह्याखाली अटक केली आहे. यानंतर लेह लडाख मध्ये संचारबंदी जारी करून इंटरनेट सेवा बंद करण्यात आलीय. सरकारच्या या दडपशाही बद्दल देशभरातून संतापाची लाट उसळलीय. वांगचूक यांच्या अटकेच्या निषेधार्थ संपूर्ण देशभरात निषेध मोर्चे काढले जात आहे. आज कोल्हापुरातही इंडिया आघाडीच्या वतीने निषेध मोर्चा आयोजित करण्यात आला होता. सकाळी दहा वाजता इंडिया आघाडीतील घटक पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं दसरा चौकात जमा झाले होते. दसरा चौकातून या मोर्चाला सुरवात झाली.
हा मोर्चा व्हीनस कॉर्नर, असेंब्ली रोड मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात आला. मोर्चेकऱ्यांनी रस्त्यावर ठिय्या मारून भाजप सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सचिव प्रा. उदय नारकर यांनी डॉ. वांगचुक यांची सुटका केली नाही तर टप्प्याटप्याने आंदोलन तीव्र करू, असा इशारा दिला.
त्यानंतर इंडिया आघाडीच्या शिष्टमंडळाने निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांना मागण्याचे निवेदन सादर करत डॉक्टर सोनम वांगचूक यांच्या सुटकेची मागणी केली. यावेळी ठाकरे गटाचे संपर्क प्रमुख विजय देवणे, काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण, राष्ट्रवादी शरदचन्द्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष आर के पोवार, कार्याध्यक्ष अनिल घाटगे, भारतीय किसान सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष अशोक ढवळे यांच्यासह इंडिया आघाडीतील घटक पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते.