कोल्हापूर पुरालेखागाराच्या जतनासाठी तातडीच्या कार्यवाहीची मागणी
वारसा स्थळांच्या संवर्धनासाठी संघटनांचा पुढाकार, आंदोलनाचा इशारा

कोल्हापूर : शेकडो वर्षांचा ऐतिहासिक दस्तऐवजांचा ठेवा जपणाऱ्या कोल्हापूर पुरालेखागाराच्या जतनासाठी तातडीची पावले उचलावीत, अशी मागणी अनेक सामाजिक आणि युवा पिढीतील संघटनांनी एकत्र येत केली आहे. या मागणीचं निवेदन सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता रोहित तोंदले यांना देण्यात आलं. या ऐतिहासिक वारसा स्थळात छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, छत्रपती ताराराणी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह अनेक थोर नेत्यांच्या अस्सल हस्ताक्षरातील कागदपत्रांचा अमूल्य संग्रह आहे. या दस्तऐवजांना सुरक्षित ठेवण्यासाठी स्वतंत्र प्रवेशद्वार, योग्य सुरक्षा व्यवस्था आणि स्थळाचा विमा उतरवण्याची गरज अधोरेखित करण्यात आली आहे.
➡️प्रमुख मागण्या -
✅ पुरालेखागारासाठी स्वतंत्र प्रवेशद्वार:
करवीर तहसील कार्यालयाच्या नव्या इमारतीत चालू असलेल्या कामामुळे धूळ आणि वर्दळ वाढली आहे. त्यामुळे दस्तऐवजांना धोका निर्माण होतो आहे.
✅ स्थळाचा विमा उतरवावा:
पुरालेखागारातील ऐतिहासिक दस्तऐवजांच्या सुरक्षिततेसाठी शासनाने तत्काळ विमा उतरवावा.
✅ ओपनबारवर कारवाई:
पुरालेखागार परिसरात बेकायदेशीर ओपनबार चालत असल्याचा आरोप करण्यात आला असून, पोलिसांनी त्यावर कारवाई करावी.
✅ राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय परिषद आयोजन:
महापुराषांचे आणि अन्य ऐतिहासिक व्यक्तिमत्त्वांच्या दस्तऐवजांच्या सन्मानार्थ, कोल्हापुरात इतिहास संशोधकांसाठी परिषद आयोजित करावी.
शासन आणि संबंधित यंत्रणांनी या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास प्रत्येक सोमवारी किंवा मंगळवारी पुरालेखागारासमोर १२ तासांचं अन्न-पाणी त्याग आंदोलन करण्यात येईल, असा इशारा सामाजिक कार्यकर्ते फिरोज शेख यांनी दिला.
यावेळी वैभवराज राजेभोसले, शुभम शिरहट्टी, राहूल चौधरी, फिरोझ शेख, उदय लाड, सचिन पाटील, राजवर्धन यादव, धैर्यशील घाटगे यांच्यासह शाहू सेना, युथ डेव्हलपमेंट फौंडेशन, महाराष्ट्र क्रांती सेना, परीखपूल नुतनीकरण समितीचे सदस्य उपस्थित होते.