मूर्ती विटंबनेच्या निषेधार्थ कोल्हापुरातील दत्त भक्तांनी काढली निषेध पदयात्रा

कोल्हापूर - गुजरात राज्यातील जुनागढ़ मधील गिरनार पर्वत रांगा या पुरातन काळातील असून पुराणात आणि इतर हिंदू धर्म ग्रंथात त्याची नोंद आहे. या ठिकाणी श्री दत्त महाराजांचे अक्षय निवासस्थान आहे. जगभरातील कोट्यावधी दत्त भक्त या ठिकाणी दर्शनासाठी जात असतात. या पवित्र स्थानी अनादी अनंत काळापासून श्री दत्त महाराज तपस्या करीत होते अशी पुराणात नोंद आहे. भगवान दत्तात्रय आणि नवनाथ यांचे अनादी काळापासून याच गिरनार पर्वतावर वास्तव्य होते. याठिकाणी ५ ऑक्टोबरला पहाटेच्या सुमारास काही समाजकंटकांनी गोरक्षनाथ मंदिरातील मूर्तीची विटंबना केली आहे. या पार्श्वभूमीवर आज कोल्हापुरातील दत्त भक्तांनी एकत्र येत मिरजकर तिकटी येथील विठ्ठल मंदिरापासून लक्ष्मीपुरी येथील गोरक्षनाथ मंदिरापर्यंत निषेध पदयात्रा काढली. या पदयात्रेत स्वरूप मालवणकर, शुभम लोहार, भालचंद्र उकिडवे, दिनेश घबाडे, संतोष घोरपडे, केदार साळुंखे आदी सहभागी झाले होते.