खंडित गॅस पुरवठ्यामुळे नागरिकांचा संताप; रस्त्यावर गॅस टाक्या ठेवून रास्ता रोको

कोल्हापूर - दिवाळीच्या तोंडावर कोल्हापुरातील संभाजीनगर परिसरात गॅस टंचाईचं संकट गडद झालं असून, संदीप गॅस एजन्सीमार्फत होणारा एलपीजी पुरवठा गेल्या अनेक दिवसांपासून खंडित आहे. परिणामी आज सकाळी संतप्त नागरिकांनी गॅस टाक्या रस्त्यावर ठेवत रास्ता रोको आंदोलन छेडलं. या आंदोलनामुळे परिसरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. गॅस एजन्सीमार्फत आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आलं.
शहरातील विविध भागांतील गॅस एजन्सींमध्ये नागरिकांनी आठ-दहा दिवसांपूर्वी गॅस सिलिंडरसाठी नोंदणी केली असूनही, अद्याप कोणताही पुरवठा करण्यात आलेला नाही. विशेष म्हणजे, एजन्सीच्या कार्यालयातील दूरध्वनी क्रमांकावर संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता, फोन उचलला जात नाही, अशी तक्रार अनेक ग्राहकांनी व्यक्त केली आहे. यामुळे नागरिकांमध्ये अस्वस्थता वाढली असून, दिवाळीच्या पार्श्वभूमीवर हा गॅस टंचाईचा प्रश्न अधिक गंभीर होत चालला आहे.
➡️गॅस नाही... पण ब्लॅकमध्ये सहज उपलब्ध?...
एजन्सीमध्ये गॅस टाक्या मिळत नसताना, शहरातील अनेक ठिकाणी गॅस ब्लॅकमध्ये विक्रीसाठी उपलब्ध असल्याचं सांगत गॅस वितरण व्यवस्थेतील भ्रष्टाचार आणि एजन्सीच्या गलथान कारभारावर नागरिकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे.
➡️नागरिकांची मागणी — दोषींवर तातडीने कारवाई करा...
“गॅस एजन्सीवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी जिल्हा पुरवठा कार्यालयाची आहे, पण ते फक्त कंपनीच्या सेल्स अधिकाऱ्याचा नंबर देतात,” अशी तक्रार नागरिकांनी केली. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर गॅस पुरवठा खंडित राहणं ही गंभीर बाब असून, यावर तातडीने उपाययोजना करण्यात याव्यात, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.