सोनम वांगचुक यांच्या अटकेच्या निषेधार्थ इंडिया आघाडीच्यावतीने १३ ऑक्टोंबरला कोल्हापुरात भव्य मोर्चा

 मोदी सरकारची हुकूमशाही संविधानावर चालणाऱ्या देशासाठी घातक : इंडिया आघाडीच्या बैठकीत टीका

 

<p>सोनम वांगचुक यांच्या अटकेच्या निषेधार्थ इंडिया आघाडीच्यावतीने १३ ऑक्टोंबरला कोल्हापुरात भव्य मोर्चा</p>

कोल्हापूर - लडाखला स्वतंत्र राज्याचा दर्जा मिळावा, यासाठी लढणारे सोनम वांगचुक यांना हुकुमशाही पद्धतीने तुरुंगात डांबून ठेवले आहे . या  निषेधार्थ इंडिया आघाडीच्या वतीने  १३ ऑक्टोंबरला जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य निषेध मोर्चा काढण्यात येणार आहे. आज झालेल्या इंडिया आघाडीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. यावेळी बैठकीत केंद्र सरकारच्या हुकूमशाही कारभाराचा निषेध  करण्यात आला.

 देशाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेला हल्ल्याचा प्रयत्न, तसेच  न्याय हक्कासाठी लढणाऱ्याना  हुकूमशाही पद्धतीने  तुरुंगात डांबण्यात येत असेल तर, मोदी सरकारची ही हुकूमशाही संविधानावर चालणाऱ्या देशासाठी घातक आहे, अशी  प्रतिक्रिया या बैठकीत मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचे नेते उदय नारकर यांनी व्यक्त केली. सोनम वांगचूक यांची तातडीने सुटका करण्यात यावी, या मागणीसाठी आणि केंद्र सरकारच्या हुकूमशाही कारभाराचा निषेध म्हणून इंडिया आघाडीच्या वतीने , 13 ऑक्टोंबरला जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचा निर्णय  या बैठकीत घेण्यात आला. दसरा चौकातून हा मोर्चा काढण्यात येणार असल्याचे  उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे सह संपर्कप्रमुख विजय देवणे यांनी यावेळी सांगितले.

या बैठकीला राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष व्ही बी.पाटील, काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण,  डी.जी. भास्कर, कॉम्रेड रघुनाथ कांबळे, शिवाजीराव परुळेकर, अनिल घाटगे, अभिजीत कांबळे, बाबुराव कदम, भारती पोवार, चंद्रकांत जाधव, सम्राट मोरे, सुभाष देसाई, विजय सूर्यवंशी, सुजय पोतदार, सुनिल देसाई, दिग्वीजय मगदूम, भरत रसाळे, मोहन सालपे आदी नेते उपस्थित होते.