‘मनाचे श्लोक’ या मराठी चित्रपटाचे नाव बदलण्याची हिंदू जनजागृती समितीची मागणी

कोल्हापूर - राष्ट्रसंत श्री समर्थ रामदास स्वामी महाराज यांनी रचलेल्या मनाचे श्लोक या पवित्र धार्मिक ग्रंथाच्या नावाचा वापर करून मराठी चित्रपट बनवण्यात आला आहे. उद्या मनाचे श्लोक हा मराठी चित्रपट प्रदर्शित होतोय. हा चित्रपट म्हणजे संत वाङ्मयाचा अपमान असून हे नाव केवळ मनोरंजन, व्यावसायिक लाभ आणि प्रसिद्धीसाठी वापरणे चुकीचे आहे. त्यामुळे या चित्रपटाचे नाव तात्काळ बदलण्यात यावे, अशी मागणी हिंदू जनजागृती समितीच्या वतीने करण्यात आली आहे.
या मागणीचे निवेदन तहसीलदार स्वप्नील पवार यांना देण्यात आले. जर या चित्रपटाचे नाव आणि यामध्ये वापरण्यात आलेला दास हा शब्द बदलला नाही तर हिंदू समाज रस्त्यावर उतरून हा चित्रपट बंद पाडेल, असा इशारा यावेळी देण्यात आला. यावेळी शिवानंद स्वामी, अशोक गुरव, दिलीप भिवटे, प्रकाश कुलकर्णी, प्रशांत पाटील, गजानन तोडकर, महेंद्र अहिरे, मनोहर सोरप, शशी बिडकर यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.