राकेश तिवारीच्या प्रतिमेचे कोल्हापुरात दहन
सरन्यायाधीशांवरील हल्ल्याच्या प्रयत्नाच्या निषेधार्थ दसरा चौकात निदर्शने

कोल्हापूर - राकेश तिवारी या माथेफिरु वकीलाने सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. याच्या निषेधार्थ भारतीय विद्यार्थी मोर्चाच्या वतीने आज दसरा चौकात निदर्शने करण्यात आली. हल्ला करण्याचा प्रयत्न करणारा वकील राकेश किशोर तिवारी याच्या प्रतिमेचे दहन यावेळी करण्यात आले. यावेळी न्यायसंस्थेचा अपमान चालणार नाही, न्यायपालिकेचा, संविधानाचा अपमान करणाऱ्यांना कडक शिक्षा झालीच पाहिजे, अशा घोषणा देण्यात आल्या.
किरण कांबळे, अॅडव्होकेट विक्रांत भोकरे, प्रतिक कांबळे, आसिफ मुजावर, शुभम शिरहट्टी आदींनी या निदर्शनांमध्ये सहभाग घेतला. दरम्यान याच ठिकाणीं वंचित बहुजन आघाडीच्यावतीने देखील मूक आंदोलन करत हल्ल्याचा निषेध नोंदवण्यात आला. सरन्यायाधीश गवई यांच्यावरील हल्ला हा भारतीय संविधानावरील हल्ला असून, ज्या वकिलाने हल्ल्याचा प्रयत्न केला. त्याच्यावर कडक कारवाई करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. या मूक आंदोलनामध्ये वंचित बहुजन आघाडीचे कोल्हापूर शहराध्यक्ष अरुण सोनवणे, सुस्मित कांबळे, जे.के. गायकवाड, आकाश कांबळे यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते.