सरन्यायाधीशांवरील हल्ल्याचा प्रयत्न भाजप आणि आरएसएस पुरस्कृत : इंडिया आघाडीचा आरोप...
सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावरील हल्ल्याचा कोल्हापुरात निषेध

कोल्हापूर - सनातन धर्म का अपमान, नहीं सहेगा हिंदुस्तान' अशी घोषणा देत राकेश किशोर या वकिलाने देशाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या दिशेने बूट भिरकावण्याचा प्रयत्न केला. या घटनेमुळे स्वतः सरन्यायाधीशांनी विचलित न होता न्यायालयीन कामकाज सुरुच ठेवले. पण देशाच्या न्यायव्यवस्थेच्या सर्वोच्च पदा वरील व्यक्तीचा हा अवमान देशवासियांना मात्र सहन झालेला नाही. राकेश किशोरच्या या माथेफिरुपणाचा देशभरातून निषेध होतोय. आज कोल्हापूरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातही इंडिया आघाडीच्या वतीने निदर्शने करत हा न्यायव्यवस्थेसह लोकशाही व्यवस्थेवरचा हल्ला असल्याच्या भावना व्यक्त करण्यात आल्या.
भाजप सरकार सत्तेत आल्यापासून संविधानावर आघात करण्याचे काम सुरू असून यामध्ये राष्ट्रीय स्वयसेवक संघ देखील सहभागी असल्याचा आरोप करत इंडिया आघाडीतील घटक पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आर. एस. एस. विरोधातही घोषणा दिल्या.
सरन्यायाधीश भूषण गवई लोकशाही व्यवस्थेचे पुरस्कर्ते शिव, शाहू, फुले आंबेडकरांचे विचार घेऊन काम करत आहेत. देशाच्या न्यायव्यवस्थेतील सर्वोच्च पदावर काम करत असतानाच सरन्यायाधीश गवई यांच्यावर झालेला भ्याड हल्ला निषेधार्ह असून देशात हुकुमशाही आणण्याचा भाजपचा प्रयत्न कदापीही सहन करणार नाही, असा इशारा शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सह संपर्कप्रमुख विजय देवणे यांनी दिलाय.
या निदर्शनांमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, भारतीय कम्युनिस्ट पार्टी, आम आदमी पार्टी, शेतकरी कामगार पक्ष, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर गट यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी आणि पक्षाचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.