कोल्हापूर, इचलकरंजीतील वकिलांनी ‘त्या' घटनेचा केला निषेध
न्यायालयीन कामकाज बंद ठेवून केला निषेध

कोल्हापूर - देशाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर सोमवारी राकेश किशोर या वकिलाने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. या घटनेनंतर देशभरातून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. त्यानुसार कोल्हापूर, इचलकरंजी बार असोसिएशनच्यावतीने घटनेचा जाहीर निषेध करण्यात आला आहे.
आज कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनच्या वतीने न्याय संकुलातील राजर्षी शाहू सभागृहात निषेध सभा घेण्यात आली. कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड व्ही. आर. पाटील, उपाध्यक्ष टी. एस पाडेकर, ऑडिटर प्रमोद दाभाडे यांनी या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध नोंदवला आहे.
या सभेत सरन्यायाधीशां वरील हल्ल्याचा प्रयत्न करण्याच्या घटनेचा निषेध म्हणून दिवसभर न्यायालयीन कामकाजावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेण्यात आला. या निषेध सभेत मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश तानाजी नलवडे, बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष अॅड. प्रकाश मोरे, अॅड प्रशांत चिटणीस यांच्यासह वकीलांनी तीव्र भाषेत निषेध नोंदवला.
इचलकरंजीत सुध्दा बार असोसिएशननं निषेध सभा घेवून या घटनेचा निषेध नोंदवलाय न्यायव्यवस्थेवरील सर्व प्रकारचे दबाव, धमक्या किंवा हल्ल्यांना विरोध करण्याचा निर्धार सर्व सदस्यांनी व्यक्त केला. वकिलांनी न्यायप्रणालीचा सन्मान राखण्याचं आणि समाजात न्यायव्यवस्थेवरील विश्वास अबाधित ठेवण्यासाठी प्रयत्नशील राहण्याची शपथ घेतली. इचलकरंजीतील वकीलांनी सुध्दा दिवसभर न्यायालयीन कामकाजावर बहिष्कार टाकला. याप्रसंगी इचलकरंजी बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. राजगोपाल रामानंद तोष्णीवाल, उपाध्यक्ष अॅड राजाराम सुतार यांच्यासह पदाधिकारी आणि वकील उपस्थित होते.