वीज दरवाढीचा झटका.. इचलकरंजीत मोर्चा

वीज दरवाढी विरोधात इचलकरंजीत महाविकास आघाडीचा प्रांताधिकारी कार्यालयावर मोर्चा

<p>वीज दरवाढीचा झटका.. इचलकरंजीत मोर्चा</p>

इचलकरंजी - महाराष्ट्र शासनाने काही महिन्यांपूर्वी अडचणीत सापडलेल्या यंत्रमाग उद्योगांना दिलासा देण्यासाठी २७ अश्वशक्ती खालील ग्राहकांना प्रती युनिट १ आणि २७ अश्वशक्ती वरील ग्राहकांना प्रती युनिट ७५ पैसे अतिरिक्त अनुदान जाहीर केलं होतं. मात्र, वीज नियामक आयोगाने या निर्णयाला स्थगिती देऊन २५ जून २०२५ रोजी नवीन आदेश जारी केले आहेत. त्यानुसार १ जुलै २०२५ पासून वाढीव वीज बिले वितरित करण्यात येत आहेत. या बिलांमध्ये मागणी शुल्क, ऊर्जा शुल्क, वहन आकार आणि इतर घटकांमध्ये वाढ करण्यात आली असून, अनुदान रद्द झाल्यामुळे बीज दरवाढीची मोठी झळ उद्‌योजकांना बसू लागली आहे. त्यामुळे या दरवाढी विरोधात काँग्रेस कमिटी ते इचलकरंजी प्रांताधिकारी कार्यालय असा मोर्चा काढण्यात आला.

 यंत्रमाग उद्योग हे देशातील शेतीनंतर सर्वाधिक रोजगार देणारे क्षेत्र आहे. आधीच आयात कापड, कर वाढ, आर्थिक मंदी यामुळे हा उद्योग संघर्ष करत आहे. अशातच वीजदर वाढ उद्योगाच्या अस्तित्वावरच घाला ठरणार असल्याचे माजी नगरसेवक शशांक बावचकर यांनी सांगितले. मोर्चाच्या वतीने प्रांताधिकारी दीपक शिंदे यांना यंत्रमाग व्यवसाय मोडकळीला आणणारी दरवाढ रद्द करावी, अशी मागणी करणारे निवेदन सादर करण्यात आले.

 यावेळी सागर चाळके, सयाजी शिंदे, उदयसिंह पाटील, राहूल खंजिरे, रवी गोंदकर, प्रकाश निकम यांच्यासह महाविकास आघाडी आणि मित्र पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच यंत्रमाग उद्योजक उपस्थित होते.