कल्याणकारी महामंडळाच्या मागणीसाठी कलाकारांचा कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा...

कोल्हापूर - विठाबाई भाऊमांग नारायणगावकर यांच्या नावाने महाराष्ट्र शासनाने कल्याणकारी महामंडळाची स्थापना करावी. या आणि अन्य मागण्यांसाठी कलाकार महासंघाच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.
कलाकार महासंघाचे संस्थापक अध्यक्ष अनिल मोरे यांनी या मोर्चाचे नेतृत्व केले. दसरा चौकातून या मोर्चाला सुरुवात झाली. डोक्यावर "मी कलाकार" अशा टोप्या घालून कलाकार या मोर्चात सहभागी झाले होते. कलाकारांना उत्पन्नाची जाचक अट रद्द करावी, त्यांना हक्काचे घर मिळावे, राज्यातील बँड, बँजो यांच्या मॉडीफाय गाड्यांना आरटीओ मार्फत शुल्क भरून परवानगी मिळावी. राज्यातील सर्व क्षेत्रातील कलाकारांच्या मुलांना शासकीय नोकरीमध्ये समाविष्ट करून घ्यावे, सर्व क्षेत्रातील कलाकारांसाठी प्रत्येक जिल्ह्यात स्वतंत्र कार्यालय व्हावे, आदी मागण्या कलाकार महासंघाच्यावतीने करण्यात आल्या.
या मोर्चात आनंद हाबळे, सुरेश साठे, बाळासाहेब गोरे, रामचंद्र जाधव यांच्यासह कलाकार सहभागी झाले होते.