दौलतच्या कामगारांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवसीय धरणे आंदोलन...

<p>दौलतच्या कामगारांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवसीय धरणे आंदोलन...</p>

कोल्हापूर - विविध प्रलंबित मागण्यांसाठी दौलत कारखान्याच्या कामगारांनी चंदगड तालुका साखर कामगार युनियन सिटूच्या माध्यमातून लढा उभारला आहे. त्यानुसार प्रलंबित मागण्याकडे लक्ष वेधण्यासाठी साखर कामगारांनी आज बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवसीय धरणे आंदोलन केले. २०१९ च्या त्रिपक्षीय वेतन करारातील वेतन श्रेणीनुसार सर्व कामगाराना त्यांच्या पदानुसार वेतन निश्चिती १०० टक्के लागू करावी, तसंच वाढत्या महागाईनुसार साखर कामगारांना महागाई भत्ता देण्यात यावा, हंगामी कामगारांना कायम सेवेत घ्यावे, ओव्हर टाईमचा पगार ज्या त्या महिन्यात द्यावा यासह अन्य मागण्या जोपर्यंत मान्य होत नाहीत, तोपर्यंत संघर्ष कायम ठेवणार असल्याचे कामगारांनी सांगितले आहे.

या धरणे आंदोलनानंतर जिल्हा प्रशासनाने साखर कामगारांच्या मागण्यांबाबत लवकर बैठक बोलवण्याचं आश्वासन दिले आहे. यावेळी माकपचे नेते कॉम्रेड उदय नारकर, किसान सभेचे संग्राम सावंत, चंद्रकांत कुरणे, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे सहसंपर्कप्रमुख विजय देवणे, संग्राम मोरे आदींनी या आंदोलनात सहभागी होत पाठींबा दिला. या धरणे आंदोलनामध्ये दौलत साखर कारखान्याचे कामगार सहभागी झाले होते.