घोटाळ्यातील जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाईसाठी पुरोगामी दलित संघाचे आंदोलन

<p>घोटाळ्यातील जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाईसाठी पुरोगामी दलित संघाचे आंदोलन</p>

कोल्हापूर - महानगरपालिकेत गेल्या पाच ते सात वर्षात वेगवेगळ्या विभागात घोटाळे झाले आहेत. ड्रेनेज पाईपलाईन घोटाळ्यात अधिकाऱ्यांनी काम न करता बिले अदा केल्याची तक्रार ठेकेदार प्रसाद वराळे यांनी केली आहे.

 यातील जबाबदार महापालिका अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, खोटी पावती पुस्तके वापरून वाहन तळाच्या ठिकाणी लाखो रुपयांचा घोटाळा झाला आहे. २५ वर्षांपूर्वी अभियंता चंद्रकांत केंबळे यांनी विद्युत विभागात ४० लाखाचा अपहार केला. या प्रकरणाचे पुढे काय झाले?, शाहू क्लॉथ मार्केट येथील सळी घोटाळा, केएमटी डिझेल घोटाळा, घरफाळा घोटाळा, रोजंदारी कर्मचारी घोटाळा, टी डी आर घोटाळा या सर्व प्रकरणांची सखोल चौकशी करून जबाबदार अधिकाऱ्यांवर तात्काळ कडक कारवाई करावी, अशी मागणी कोल्हापुरातील पुरोगामी दलित संघाने  केली आहे.

या मागणीसाठी संघाच्यावतीने महापालिकेच्या प्रवेशद्वारा नजीक असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ बेमुदत धरणे  आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात जिल्हाध्यक्ष सतीश कांबळे, सामाजिक कार्यकर्ते केशव लोखंडे यांच्यासह दलित संघाचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.