महावितरणच्या स्मार्ट मीटर विरोधात शिये ग्रामस्थ आक्रमक...

कोल्हापूर – कोल्हापूर जिल्ह्यात महावितरण कंपनीकडून स्मार्ट मीटर बसवण्याचा सपाटा सुरु झाला आहे. या स्मार्ट मीटरमुळे विज बिल वाढून येत असल्याचे अनेक वेळा दिसून आले आहे. त्यामुळे या स्मार्ट मीटरला शिये ग्रामस्थांनी जोरदार विरोध केला आहे.
नागरिकांची मागणी नसताना आणि सरकारचा आदेश नसताना स्मार्ट मीटर का बसवण्यात येत आहेत, असा जाब विचारत शिये ग्रामस्थांनी महावितरणच्या उपकेंद्रात सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
करवीर तालुक्यातील शिये येथे एका खाजगी कंपनीकडून न सांगता घरी कुणी नसल्याचं पाहून दुपारच्या वेळी स्मार्ट मीटर बसवले जात आहेत. शासनाचा कोणताही आदेश नसताना तसेच जनतेची मागणी नसताना स्मार्ट मीटर का बसवले जातात, अशी विचारणा ग्रामस्थांमधून होवू लागली आहे. यावर शिये ग्रामस्थांनी आज बसवलेले स्मार्ट मीटर महावितरणच्या शिये उपकेंद्रात जाऊन कनिष्ठ अभियंता गावडे यांना दिले आणि पुन्हा जर मीटर बसवण्यासाठी अनोळखी व्यक्ती जर गावात फिरत असल्याचे दिसून आलं तर होणाऱ्या परिस्थितीला संबंधित महावितरण अधिकारी जबाबदार राहील, असा इशारा शेतकरी संघटनेचे अॅड, माणिक शिंदे यांनी दिला आहे.
यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य बाजीराव पाटील ,जयसिंग पाटील ,दयानंद कांबळे ,शहाजी काशीद, पांडुरंग मगदूम ,उत्तम पाटील, भगवान शिंदे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.