प्रतीकात्मक अंत्ययात्रा काढत, प्रतिमेला जोडे मारत आणि श्वानाच्या गळ्यात प्रतिमा लावून आ.पडळकरांचा कोल्हापुरात निषेध

कोल्हापूर- राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आणि माजी प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांच्याबाबत भाजपचे आमदार आमदार गोपीचंद पडळकर यांनी वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे राज्यभरात संतापाची लाट उसळलीय. या विरोधात राज्यभर तीव्र पडसाद उमटतायत. आज कोल्हापुरात राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) च्या युवक आणि विद्यार्थी कार्यकर्त्यांनी दसरा चौकात तीव्र आंदोलन करत त्यांचा निषेध नोंदवला. आमदार पडळकर यांची प्रतीकात्मक अंत्ययात्रा काढण्यात आली, प्रतिमेला जोडे मारण्यात आले आणि त्यांच्या प्रतिमेला श्वानाच्या गळ्यात लावून निषेध व्यक्त करण्यात आला. आंदोलनादरम्यान पडळकरांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला. आमदार पडळकर यांची विधिमंडळातून हकालपट्टी करावी अशी जोरदार मागणी देखील करण्यात आली.
यावेळी प्रदेश प्रवक्ते मकरंद कुलकर्णी, प्रदेश सरचिटणीस विनय कदम ,जिल्हा युवक कार्याध्यक्ष संतोष मेंघाने, शहर युवक अध्यक्ष मकरंद जोंधळे, विद्यार्थी जिल्हा अध्यक्ष राहुल गव्हाणे, विद्यार्थी शहराध्यक्ष गणेश नलवडे, ऋषिकेश चांदणे, रविराज सोनुले, ऋषिकेश हुंनुरे, राहुल आवळे, आदित्य निळकंठ यांच्यासह युवक व विद्यार्थी संघटनेचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.