कोल्हापुरात ३,००० डॉक्टरांचा संप; वैद्यकीय सेवा एक दिवसासाठी विस्कळीत

कोल्हापूर – होमिओपॅथी डॉक्टरांना महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल (MMC) मध्ये नोंदणी देण्याच्या शासन निर्णयाला तीव्र विरोध करत कोल्हापुरातील सुमारे ३,००० डॉक्टर आज १८ सप्टेंबर रोजी संपावर गेले आहेत. या संपात सीपीआर हॉस्पिटलमधील २०० निवासी डॉक्टर, इंटर्न्स आणि वरिष्ठ निवासी डॉक्टरांचा सहभाग आहे. संप आज सकाळी ८ वाजता सुरू झाला असून तो उद्या १९ सप्टेंबर रोजी सकाळी ८ वाजेपर्यंत चालणार आहे. या काळात ओपीडी, वॉर्ड सेवा आणि इतर अनावश्यक सेवा बंद राहतील. मात्र रुग्णांची गैरसोय होऊ नये म्हणून इमर्जन्सी, ICU आणि अतिआवश्यक सेवा सुरू ठेवण्यात येणार आहेत.
होमिओपॅथी डॉक्टरांना MMC मध्ये नोंदणी करू नये, त्यांच्यासाठी आधीपासून असलेल्या होमिओपॅथिक कौन्सिलच्या नोंदणीमध्येच त्यांना स्थान द्यावे अशी डॉक्टरांची प्रमुख मागणी आहे. तसेच, आमच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर हा संप कायमस्वरूपी ठेवण्याचा इशारा डॉक्टरांनी दिला आहे.आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मंत्री आशिष शेलार यांनी आंदोलक डॉक्टरांची भेट घेतली. डॉक्टरांच्या मागण्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापर्यंत पोहोचवल्या जातील, असे आश्वासन त्यांनी दिले.
मागणीचे निवेदन MARD कोल्हापूरचे अध्यक्ष व Central MARD चे उपाध्यक्ष डॉ. उत्कर्ष देशमुख, उपाध्यक्ष डॉ. साईनाथ गोरे, डॉ. मन्मथ मार्कड, डॉ. प्रणाली देशमुख व डॉ. कृत्तिका भोयर, इंटर्न संघटनेचे अध्यक्ष डॉ. प्रथम पवार यांनी प्रशासनाला दिले.