वैदयकीय शिक्षण विभागाच्या निर्देशाविरोधात डॉक्टरांचा एकदिवसीय संप

<p>वैदयकीय शिक्षण विभागाच्या निर्देशाविरोधात डॉक्टरांचा एकदिवसीय संप</p>

कोल्हापूर - शासनाच्या वैद्यकीय शिक्षण आणि औषध द्रव्य विभागाने जारी केलेल्या परिपत्रकाद्वारे सीसीएमपी अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या होमिओपॅथिक डॉक्टरांची नोंदणी महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलच्या स्वतंत्र रजिस्टरमध्ये करण्याचे निर्देश दिलेत. या निर्णयाला राज्यातील वैद्यकीय संघटनांनी विरोध दर्शवलाय.

या पार्श्वभूमीवर राज्यातील डॉक्टरांच्या विविध संघटनांनी आज एक दिवसीय संपाची हाक दिली होती. त्यानुसार कोल्हापुरातही डॉक्टरांच्या संघटना या संपात सहभागी झाल्या होत्या. मार्डच्या कोल्हापूर शाखेने सीपीआर आवारात काम बंद ठेवून ठिय्या आंदोलन केले. यावेळी आंदोलकांनी राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. केवळ आपत्कालीन काळात आरोग्य सेवा बजावत दिवसभर हे आंदोलन करण्यात आले. यावेळी कोल्हापूर शाखेचे अध्यक्ष उत्कर्ष देशमुख यांनी राज्य सरकारच्या या निर्णयामुळे नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे हा निर्णय मागे घ्यावा अन्यथा आंदोलन आणखी तीव्र करू असा इशारा दिलाय.

या आंदोलनात उपाध्यक्ष साईनाथ गोरे, डॉक्टर प्रणाली देशमुख, प्रथम पवार, शुभम बहिरठ, आदिती बोराडे यांच्यासह अन्य डॉक्टर सहभागी झाले होते.