कोल्हापूर – गगनबावडा रस्त्याच्या रुंदीकरणामुळे शेतकऱ्यांची अडचण, रस्ते न केल्यास उपोषणाचा इशारा

कोल्हापूर – कोल्हापूर गगनबावडा राष्ट्रीय महामार्गाचे रुंदीकरण सध्या वेगाने सुरू आहे. मात्र दोनवडे ते बालिंगा दरम्यान रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी भरावाची उंची २२ ते २५ फूटांपर्यंत वाढल्यामुळे आसपासच्या शंभर एकर शेतीच्या वापरावर मोठा परिणाम झाला आहे. मुख्य रस्त्याला जोडणारे शेतरस्ते अद्याप न झाल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी उपोषणाचा इशारा दिला.
✔️ शेतकऱ्यांची प्रमुख अडचण:
➡️भरावामुळे शेतीकडे जाणारा मार्ग बंद – मशागतीसाठी यंत्रं नेणं अशक्य
➡️ऊस वाहतूक, खते-औषध फवारणी, चारा वाहतूक अशक्य
➡️पावसात गाड्या घसरून अपघात, पाय मुरगळण्याचे प्रकार वाढले
➡️दोन वर्षांपासून काम सुरू असूनही शेत रस्त्यांकडे दुर्लक्ष
अचानक शेकडो शेतकरी रस्त्याच्या कामावर एकत्र जमले आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या ठेकेदार व अभियंत्यांना जाब विचारत धारेवर धरले. यावेळी “मोरीचे काँक्रीटचे काम पूर्ण झाल्यानंतर तातडीने दोन्ही बाजूंनी शेत रस्ते तयार केले जातील.” असे ठेकेदार मदन पाटील आणि अभियंता नितीन पाटील यांनी उपस्थित राहून आश्वासन दिलं. दरम्यान, हंगामपूर्व ऊस वाहतुकीसाठी रस्ते न झाल्यास उपोषणाला बसणार असल्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.
बैठकीला शिवाजी ढेरे, उत्तम दिवसे, रंगराव कळके, बाबुराव मगदूम, निलेश पाटील, संभाजी मारकळी, वसंत पाटील (साबळेवाडी), राजाराम मगदूम, केशव पोवाळकर, आनंदराव कळके, परशुराम कळके यांच्यासह दोनवडे, साबळेवाडी, नागदेववाडी येथील शेतकरी उपस्थित होते.