तळगांवच्या पाटील कुटुंबियांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण...

<p>तळगांवच्या पाटील कुटुंबियांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण...</p>

कोल्हापूर - राधानगरी तालुक्यातील तळगाव येथील तानाजी पाटील हे शेळीपालन करतात.  त्यांनी जमिनीच्या व्यवहारातून आपली आर्थिक फसवणूक झाल्याची तक्रार केली आहे.

आपल्या व्यवसायासाठी त्यांनी सागर कांबळे या व्यक्तीला कामगार म्हणून ठेवले होते. कामावर असताना सागर कांबळे याला त्यांच्या कुटुंबातील आर्थिक अडचणी दूर करण्यासाठी मदत म्हणून आगाऊ रक्कम देण्यात आली होती. त्या बदल्यात सागर कांबळे आणि त्याच्या वडिलांनी वडिलोपार्जित शेतजमीन विकण्याचे मान्य करून नोटरीद्वारे व्यवहार केला होता. जमीन व्यवहारापोटी कांबळे यांनी गुंठा ३० हजार रुपयांप्रमाणे एकूण १ लाख ५५ हजार रुपये रोख देण्यात आल्याचा दावा पाटील यांनी केला आहे.

नोटरीनंतर संबंधित जमीनही ताब्यात देण्यात आल्याचे ते सांगतात. मात्र या व्यवहारावरून आता वाद निर्माण झाला असून, संबंधित व्यक्तीवर कारवाई करून रक्कम परत मिळवून द्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. याबाबत पोलिस प्रशासन तसेच जिल्हा प्रशासनाला वारंवार कळवूनही अद्याप न्याय मिळाला नसल्याचे सांगत तानाजी पाटील यांनी कुटुंबियांसह जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरु केले आहे.

तानाजी पाटील यांच्यासह त्यांचे वडील अंकुश, पत्नी गीता, मुलगी धनश्री यांनी उपोषणात सहभाग घेतला आहे. कांबळे यांच्याकडून दोन लाख रुपयांची रक्कम मिळेपर्यंत आमरण उपोषण मागे घेणार नाही, असा पवित्रा पाटील कुटुंबियांनी घेतला आहे.