सेवानिवृत्त बँक कर्मचाऱ्यांचे विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन

<p>सेवानिवृत्त बँक कर्मचाऱ्यांचे विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन</p>

कोल्हापूर - अखिल भारतीय निवृत्त बँक कर्मचारी संघटनेच्या नेतृत्वाखाली सेवानिवृत्त बँक कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. यावेळी गेल्या ३३ वर्षापासून बँक कर्मचाऱ्यांच्या पेन्शन करारानुसार मासिक पेन्शनमध्ये सुधारणा झालेली नाही. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी स्वीकारलेल्या सूत्रानुसार पेन्शनचे अपडेशन करणे, सन २०१२ पासून निवृत्त कर्मचाऱ्यांना देण्यात येणाऱ्या विशेष भत्त्याच्या आधारे मूळ पेन्शनची गणना करणे, निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी ग्रुप आरोग्य विमा पॉलिसींवरील जीएसटी माफ करणे, इंडियन बँक्स असोसिएशनच्या अधिपत्याखाली निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी सर्वोच्च स्तरावरील तक्रार निवारण यंत्रणा निर्माण करणे, किमान पेन्शन दरमहा दहा हजार रुपये निश्चित करणे यासह अन्य मागण्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी केल्या आहेत.

या मागण्याचे निवेदन नायब तहसीलदार नम्रता चौगुले यांना देण्यात आले. यावेळी कर्मचाऱ्यांशी द्विपक्षीय चर्चा झाली पाहिजे, पेन्शन वाढ मिळालीच पाहिजे, मोफत वैद्यकीय विमा संरक्षण मिळावे, या मागण्यांकडे घोषणाबाजी करत लक्ष वेधण्यात आले.

यावेळी संघटनेचे राज्याध्यक्ष भास्कर भावे, सरचिटणीस दिनार कवीश्वर, केंद्रीय कार्यकारीणी सदस्य एकनाथ कांबळे, राजन नेरुळकर, जिल्हा समन्वय समिती कोल्हापूरचे सदस्य विलास राजमाने, मकरंद करंदीकर, प्रतापराव पाटील यांच्यासह सेवानिवृत्त बँक कर्मचारी उपस्थित होते.