कोल्हापूरात इंडिया आघाडीची अमेरिकेविरोधात निदर्शने...
कोल्हापूर - अमेरिकेविरोधात इंडिया आघाडीच्यावतीने कोल्हापुरातील मध्यवर्ती बस स्थानक परिसरात निदर्शने करण्यात आली. अमेरिकेने व्हेनेझुएलावर आक्रमण करत राष्ट्राध्यक्ष निकालेस मादुरो आणि त्यांच्या पत्नीचे अपहरण केले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे गँगस्टारसारखे वागत आहेत, असा आरोप करत अमेरिकेच्या या साम्राज्यवादी दहशतवादाचा इंडिया आघाडीच्यावतीने निषेध करण्यात आला.
यावेळी बोलताना कॉम्रेड रघुनाथ कांबळे यांनी, व्हेनेझुएला मध्ये तेलासोबतच सोने आणि इतर मौल्यवान खनिजांचा प्रचंड साठा असल्याने या संपत्तीसाठीच अमेरिकेने हे कारस्थान रचल्याचा आरोप केला. अमेरिकेकडून सुरु असलेल्या मनमानी काराभाराबाबत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि परराष्ट्र खात्याने कोणताही निषेध केला नसल्याने इंडिया आघाडीच्यावतीने संताप व्यक्त करण्यात आला.
यावेळी ट्रम्प मुर्दाबाद, साम्राज्यशाही मुर्दाबाद, हुकमशाहीचा धिक्कार अशा घोषणा देण्यात आल्या. या निदर्शनांमध्ये कॉम्रेड उदय नारकर कॉम्रेड अतुल दिघे, मेघा पानसरे, भरत रसाळे, दिलदार मुजावर, विवेकानंद गोडसे, शंकर कटाळे, रसिया पडळकर, सुनिता जाधव, रवी जाधव, सुनील जाधव, इर्शाद फरास, रमेश वडणगेकर यांच्यासह इंडिया आघाडीतील घटक पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते.