खडी मशीन विरोधात मांडेदुर्ग ग्रामस्थांचं चंदगड तहसील कार्यालयासमोर साखळी आंदोलन

<p>खडी मशीन विरोधात मांडेदुर्ग ग्रामस्थांचं चंदगड तहसील कार्यालयासमोर साखळी आंदोलन</p>

चंदगड तालुक्यातील मांडेदुर्ग गावच्या हद्दीत खडी क्रशर मशीन सुरूयत सुरक्षा नियमांना धाब्यावर बसवून या ठिकाणी वारंवार जिलेटीनचा वापर करत स्फोट करून दगड फोडले जातायत. काही दिवसांपूर्वी डोंगराकडील वाटेवर असलेल्या खडी क्रशर खार्णीमध्ये सुरुंग लावून मोठा स्फोट करण्यात आला. हा स्फोट इतका तीव्र होता की मांडेदुर्गसह सुंडी, कार्वे आणि ढोलगरवाडी या गावांमध्येही भूकंप झाल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली. अनेक घरांच्या भिंतींना तडे गेले, खिडक्यांच्या काचा फुटल्या, स्फोटाच्या आवाजानं घाबरलेले लोक घराबाहेर धावत आले. या घटनेत सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र यामुळं ग्रामस्थांमध्ये संताप व्यक्त केला जातोय स्थानिकांनी बेकायदेशीर आणि जीविताला धोका पोहचवणाऱ्या खडी क्रशर मशीन तात्काळ बंद करण्याची जोरदार मागणी केली होती. मागणी करूनही मशीन बंद न केल्यामुळं आज चंदगड तहसीलदार कार्यालयाच्या समोर ग्रामस्थांनी साखळी आंदोलनाला सुरुवात केलीय जोपर्यंत मांडेदुर्ग हद्दीतील खडीमशीन कायमस्वरूपी बंद होणार नाहीत तोपर्यंत हे साखळी उपोषण आंदोलन मागे घेणार नाही असा निर्धार आंदोलकांनी केलाय. आंदोलनात मांडेदुर्ग गावातील सुमारे ४०० ग्रामस्थांनी सहभाग घेतला.

दरम्यान, अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे खडी मशीन सुरु असून त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारची तपासणी अथवा पंचनामा केला जात नसल्याचा आरोप यावेळी प्रा.बी एम पाटील यांनी केला.

यावेळी सरपंच विनायक कांबळे, उपसरपंच गणपती पवार, माजी तंटामुक्त अध्यक्ष बी एम पाटील, नाना डसके, दयानंद भोगण, सुनील पाटील,संजय धामणेकर, शांता पाटील यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते