बाळूमामा देवस्थान ट्रस्टच्या सचिवांच्या घरावर हालसिद्धनाथ बाळूमामा सेवेकरी मंडळाचा रविवारी मोर्चा

<p>बाळूमामा देवस्थान ट्रस्टच्या सचिवांच्या घरावर हालसिद्धनाथ बाळूमामा सेवेकरी मंडळाचा रविवारी मोर्चा</p>

कोल्हापूर - आदमापूरच्या संत बाळूमामा देवस्थान ट्रस्टवर भ्रष्टाचाराचे आरोप होत असतानाच आता गेल्या तीन महिन्यांपासून देवस्थान ट्रस्टच्या मेंडक्यांचे तसेच मंदिरातील कामगारांचे पगार थकीत असल्याचे सेवेकरी मंडळाचे अध्यक्ष निखिल मोहिते यांनी सांगितले आहे. बाळूमामा देवस्थान ट्रस्टची स्वः मालकीची जमीन आहे. मात्र ट्रस्टचे अध्यक्ष धैर्यशील भोसले हे स्वतःच्या जमिनीवर खासगी वाहने पार्किंग करून पैसे गोळा करत आहेत. तसेच देवस्थानच्या काही जमिनीची विक्री देखील करण्यात आलीय, असे गंभीर आरोप निखिल मोहिते यांनी केले आहे. बाळूमामा देवस्थान ट्रस्ट मधील दोन गटांमध्ये वारंवार वाद आणि हाणामारीचे प्रकार घडत आहेत. यामुळे  देवस्थानची नाहक बदनामी होत आहे. बाळूमामा देवस्थान ट्रस्ट बरखास्त करून प्रशासकांची नियुक्ती करावी, या मागणीसाठी हालसिद्धनाथ बाळूमामा सेवेकरी मंडळाच्यावतीने रविवारी २८ डिसेंबर रोजी मेंडके आणि कामगारांसह ट्रस्टचे सचिव रावसाहेब कोणकरी यांच्या घरावर मोर्चा काढणार असल्याचे निखिल मोहिते यांनी पत्रकार बैठकीत सांगितले.

संत बाळूमामा देवस्थान ट्रस्टच्या कर्मचाऱ्यांना तसेच मेंडकयांना गेल्या तीन महिन्यांपासून पगार मिळत नसल्यामुळे त्यांच्या कुटुंबियांचे हाल होत आहे, याची प्रशासनाने गांभीर्याने दखल घ्यावी, अशी मागणीही मोहिते यांनी केलीय. यावेळी विशाल शिंदे, संजय शिंदे उपस्थित होते.