कष्ट, शिस्त व धैर्याचे फळ – बागिलगे गावचा सुपुत्र तुषार पाटील ITBP मध्ये अव्वल
चंदगड : देशसेवेचे स्वप्न उराशी बाळगून जिद्द, कठोर परिश्रम आणि शिस्तीच्या जोरावर बागिलगे गावचे सुपुत्र तुषार तानाजी पाटील यांनी इंडो-तिब्बत बॉर्डर पोलिस फोर्स (ITBP) मध्ये उल्लेखनीय यश संपादन करत गावासह तालुका व जिल्ह्याचा गौरव वाढवला आहे. तामिळनाडू येथील ITBP च्या आर.टी.सी. शिवगंगाई या नामांकित प्रशिक्षण केंद्रात झालेल्या प्रशिक्षणात १२४४ प्रशिक्षणार्थींमधून प्रथम क्रमांक पटकावत त्यांनी ‘ओव्हर ऑल बेस्ट ट्रेनी’ हा मानाचा पुरस्कार मिळवला आहे.
या उल्लेखनीय यशाबद्दल तुषार पाटील यांना ITBP चे महानिदेशक (DG) मनु महाराज यांच्या शुभहस्ते, प्रमुख अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सन्मानित करण्यात आले. प्रशिक्षण कालावधीत शारीरिक तंदुरुस्ती, शस्त्रप्रशिक्षण, शिस्त, नेतृत्वगुण तसेच एकूण कामगिरी या सर्वच बाबींमध्ये त्यांनी उत्कृष्ट कामगिरी करत अव्वल स्थान मिळवले.
साध्या कुटुंबातील तुषार ने अत्यंत कष्टाने हे घवघवीत यश मिळवले आहे. देशाच्या सीमांचे संरक्षण करण्याची तीव्र इच्छा, सातत्यपूर्ण मेहनत, संयम आणि आत्मविश्वास यांच्या बळावर त्यांनी हे सर्वोच्च यश संपादन केले. त्यांचा संघर्षमय व प्रेरणादायी प्रवास आजच्या युवकांसाठी दिशादर्शक ठरत आहे.
तुषार पाटील यांच्या या यशामुळे बागिलगे गावात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, ग्रामस्थ, मित्रपरिवार, नातेवाईक तसेच विविध सामाजिक, शैक्षणिक व युवक संघटनांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. देशसेवेसाठी प्रयत्नशील असलेल्या तरुणांसाठी तुषार पाटील यांचे यश निश्चितच “मेहनतीला पर्याय नाही” हा संदेश देणारे ठरत आहे.