वडिलांचे स्वप्न, जिद्द आणि दुःखावर मात करत ‘जक्कनहट्टी’च्या लेकीचा ‘रिव्हॉल्व्हर ऑफ ऑनर’पर्यंतचा प्रवास
चंदगड : जक्कनहट्टी या दुर्गम खेड्यातील प्रियांका शामल शांताराम पाटील हिने अथक परिश्रम, जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर संपूर्ण महाराष्ट्रात प्रथम येत महाराष्ट्र पोलीस उपनिरीक्षक (PSI) पदाला गवसणी घातली आहे.
चंदगड तालुक्यातील अवघ्या साडेचारशे लोकवस्तीचे, डोंगरकपाऱ्यांत वसलेले जक्कनहट्टी हे एक दुर्गम गाव. इथूनच उगम पावली प्रियांका शामल शांताराम पाटील हिच्या स्वप्नाची, संघर्षाची आणि अखेर विजयाची कहाणी. या नायिकेने संपूर्ण महाराष्ट्रात प्रथम क्रमांक मिळवत महाराष्ट्र पोलीस उपनिरीक्षक (PSI) पद मिळवले. ही केवळ एक यशोगाथा नाही, तर पितृछत्र हरपल्यानंतरही न डगमगता उभी राहिलेल्या लेकीच्या जिद्दीची विशेष कहाणी आहे.
“माझी लेक एक दिवस पोलिस अधिकारी होईल…” सैन्यात कार्यरत असलेले शांताराम पाटील हे स्वप्न मनाशी बाळगून होते. शिस्त, देशभक्ती आणि कर्तव्यनिष्ठा हे संस्कार त्यांनी लहानपणापासूनच आपल्या मुलांमध्ये रुजवले. मात्र कोरोना महामारीने घाला घातला आणि प्रियांकाच्या आयुष्यातील सर्वात मजबूत आधार अचानक निघून गेला. दुःख प्रचंड होते. जबाबदाऱ्या वाढल्या. अनेक स्वप्ने अशा वेळी अर्ध्यावरच तुटतात. पण प्रियांकाने वेगळाच निर्णय घेतला—वडिलांचे स्वप्न अपूर्ण राहू द्यायचे नाही.
जक्कनहट्टीसारख्या दुर्गम गावातून, मर्यादित साधनांमध्ये स्पर्धा परीक्षेची तयारी करणे सोपे नव्हते. मानसिक ताण, आर्थिक अडचणी, कौटुंबिक जबाबदाऱ्या, या सगळ्यांवर मात करत तिने अभ्यास सुरू ठेवला. दिवस-रात्र एक करून ती ध्येयाच्या मागे धावत राहिली.
पहिल्याच प्रयत्नात २०२१ च्या पोलिस उपनिरीक्षक भरती परीक्षेत तिने यश संपादन केले. यानंतर महाराष्ट्र पोलीस अकादमीत दाखल होत बारा महिन्यांचे अत्यंत कठोर प्रशिक्षण सुरू झाले. इथेच तिच्या जिद्दीची खरी कसोटी लागली. शारीरिक कसरत, कायद्याचे ज्ञान, नेमबाजी, शिस्त आणि नेतृत्व. प्रियांकाने प्रत्येक क्षेत्रात आपली छाप पाडली. प्रशिक्षणाच्या अखेरीस तिने तब्बल पाच मानाचे पुरस्कार पटकावत ‘उत्कृष्ट प्रशिक्षणार्थी’ होण्याचा बहुमान मिळवला. त्यातील सर्वात मानाचा सन्मान ‘रिव्हॉल्व्हर ऑफ ऑनर’. तो क्षण केवळ तिच्या कर्तृत्वाचा नव्हता; तो दिवंगत वडिलांना दिलेले अभिवादन होते. तिची शैक्षणिक वाटचालही तितकीच प्रेरणादायी आहे. दहावीत ९०, बारावीत ९६ टक्के गुण, औषधनिर्माणशास्त्र (फार्मसी) शाखेतील पदवीत तृतीय क्रमांक हे सगळे तिच्या सातत्याचे द्योतक आहे. अवघ्या २७ व्या वर्षी ती पोलिस दलात अधिकारी म्हणून सज्ज झाली आहे. या परीक्षेत ती मुलींमधून तिसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण झाली. तिला रिव्हॉल्व्हर ऑफ ऑनर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर कप, अहिल्याबाई होळकर कप, एन. एम. कामटे गोल्ड कप, यशवंतराव चव्हाण गोल्ड कप, बेस्ट कॅडेट इन स्टडीज असे अनेक सन्मान मिळाले.
घरातील संस्कारांचाही या यशात मोठा वाटा आहे. आई शामला पाटील यांनी गृहिणी म्हणून कुटुंबाची धुरा सांभाळत मुलांना खंबीर पाठिंबा दिला. भाऊ संदीप पाटील याने पाच वर्षांपूर्वी सैन्यदलात प्रवेश करून कुटुंबाची परंपरा पुढे नेली. बुधवारी झालेल्या दीक्षांत संचलनात पारितोषिक स्वीकारताना प्रियांकाच्या डोळ्यांत यशाचा अभिमान तर होताच, पण मनाच्या एका कोपऱ्यात वडिलांची आठवणही दाटून आली होती. “आज या आनंदाच्या क्षणी वडील माझ्यासोबत नाहीत, ही सल कायम आहे. पण आयुष्यात आलेल्या प्रत्येक अडचणीवर धैर्याने मात केल्यामुळेच अंतिम ध्येय गाठू शकले,” असे भावूक शब्द तिने व्यक्त केले.
सध्या प्रियांका पाटील यांची नागपूर शहरात नियुक्ती झाली असून, जक्कनहट्टी गावाची ती पहिली महिला पोलिस उपनिरीक्षक आणि पहिली अधिकारी ठरली आहे. तिच्या यशामुळे चंदगड तालुका आणि कोल्हापूर जिल्ह्याला राज्यपातळीवर गौरव मिळाला आहे. परिस्थिती कितीही कठीण असली, तरी जिद्द, मेहनत आणि स्वप्नांवरचा विश्वास असेल, तर दुर्गम गावातूनही ‘रिव्हॉल्व्हर ऑफ ऑनर’पर्यंतचा प्रवास शक्य आहे हे तिच्या कर्तृत्वातून दिसून येते.