खडी क्रशरच्या स्फोटाने मांडेदुर्ग हादरले;दगड फोडण्या साठीचा स्फोट की भूकंप ?
मांडेदुर्ग मधील दगड खाणीतील स्फोटामुळं परिसरात भूकंपा सारखी स्थिती
चंदगड - चंदगड तालुक्यातील मांडेदुर्ग गावच्या परिसरात दगड खाणी आहेत. या खाणीं मध्ये सुरक्षा विषयक नियम धाब्यावर बसवून दगड काढण्यासाठी वारंवार जिलेटीनचा वापर करत स्फोट केले जातात. या गंभीर प्रकारा विरोधात ग्रामस्थांनी तहसीलदार आणि जिल्हाधिकारी कार्यालयात वेळोवेळी तक्रार अर्ज सादर केलेयत. मात्र, महसूल प्रशासनाच्या उदासीनतेमुळं अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. आज सकाळी डोंगराकडील वाटेवर असलेल्या दगड खाणीत स्फोट करण्यात आला. या स्फोटाची तीव्रता इतकी होती की मांडेदुर्ग आणि परिसरात हा दगड खाणीतला स्फोट होता की भूकंप अशी स्थिती निर्माण झालीय. मांडेदुर्गसह सुंडी, कार्वे आणि ढोलगरवाडी या गावांमध्ये भूकंप झाल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली. अनेक घरांच्या भिंतींना तडे गेले असून, खिडक्यांच्या काचा फुटल्यायत, तर काही घरांतील साहित्यांचं नुकसान झालंय. स्फोटाच्या आवाजानं घाबरलेले लोक घराबाहेर धावत सुटले. सुदैवानं यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र गावकऱ्यांमध्ये तीव्र भीती आणि संतापाचं वातावरण निर्माण झालंय. संतप्त ग्रामस्थांनी बेकायदेशीर आणि जीविताला धोका ठरणाऱ्या दगड खाणी बंद कराव्यात अशी मागणी केलीय. आज घरांचं नुकसान झालंय, उद्या लोकांचे जीव गेले तर त्याला प्रशासन जबाबदार राहणारय का असा सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केलाय. दगड खाणीतील दगड काढण्यासाठीच्या नियमांचा भंग करत दगड काढून चालवण्यात येणारे क्रशर मशीन तात्काळ बंद करावेत अन्यथा आंदोलन छेडू असा इशारा ग्रामस्थांनी दिलाय. प्रशासन आता यावर काय कारवाई करतंय हे बघावं लागेल.