सांबरे इथं महाप्रसादातून विषबाधेचा कहर; २५० नागरिकांना उलट्या-जुलाबाचा त्रास,रुग्णालयांत गर्दी
गडहिंग्लज – तालुक्यातील सांबरे इथं शुक्रवारी दत्त जयंतीच्या धार्मिक कार्यक्रमात महाप्रसादातून गंभीर विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना घडलीय. या घटनेत लहान मुले, महिला आणि वृद्धांसह तब्बल सुमारे २५० हून अधिक नागरिक बाधित झाले असून, उलट्या–जुलाब, पोटदुखी व मळमळ अशी लक्षणे मोठ्या प्रमाणावर दिसून येतात. या प्रकारामुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडालीय.
शुक्रवारी सकाळी दत्त जयंतीनिमित्त गावात धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. आजूबाजूच्या खेड्यांतील मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते. कार्यक्रमानंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. दुपारपासून प्रसाद सेवन केलेल्या अनेक नागरिकांना प्रकृतीबाबत तक्रारी सुरू झाल्याने परिस्थिती गंभीर झाली. अचानक एवढ्या मोठ्या संख्येने रुग्णांची भर पडल्याने आरोग्य यंत्रणेची चांगलीच तारांबळ उडाली. बाधितांना तत्काळ रुग्णवाहिका व उपलब्ध इतर वाहनांतून कानडेवाडी, नेसरी, माणगाव, कोवाड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रे, तसेच गडहिंग्लज उपजिल्हा रुग्णालय, के.एल.ई. हॉस्पिटल बेळगाव व विविध खासगी दवाखान्यांमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. अनेकांवर तातडीने उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले आहे.
घटनेची माहिती मिळताच प्रांताधिकारी एकनाथ काळबांडे, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. चंद्रकांत खोत, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. गीता कोरे यांच्यासह आरोग्य अधिकाऱ्यांनी परिस्थितीचा तातडीने आढावा घेतला. बाधितांवर योग्य उपचार होतील यासाठी आवश्यक निर्देश देण्यात आले आहेत.
आरोग्य विभागाने तत्काळ गावात पथके पाठवून घरोघरी तपासणी सुरू केले आहे. अन्नातून विषबाधा झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष असून, प्रसादाच्या नमुन्यांची तपासणी प्रयोगशाळेत सुरू आहे.