दुंडगेत पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ; आठ शेतकरी व नऊ जनावरांना चावा
चंदगड – चंदगड तालुक्यातील दुंडगे येथे मंगळवारी दुपारी एका पिसाळलेल्या कुत्र्यानं अक्षरशः धुमाकूळ घालत शेतात काम करणाऱ्या आठ शेतकऱ्यांसह नऊ जनावरांना चावा घेवून जखमी केलं. अचानक झालेल्या या हल्ल्यानंतर परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं असून ग्रामस्थांमध्ये एकच धावपळ उडाली.
ही घटना मंगळवारी दुपारी दोनच्या सुमारास ‘रांगी’ शेतात घडली. शेतकरी भात कापणी व मळणी करत असताना कुत्र्यानं अचानक हल्ला चढवला. शेतकरी आरडाओरड करत पळू लागले. कुत्र्यानं सरिता शिवाजी गवेकर, विमल संभाजी पाटील, भरमू मारुती पाटील, निकेश अरविंद कांबळे, संतोष मनोहर वडर यांच्यासह आठ जणांना चावा घेवून जखमी केलं. यानंतर बैल, गाय आणि शेळ्यांवर हल्ला करत नऊ जनावरांना जखमी केलं.
सर्व जखमी शेतकऱ्यांना तात्काळ रुग्णवाहिकेतून कोवाड प्राथमिक आरोग्य केंद्रात हलविण्यात आलं. तिथं प्राथमिक उपचार करून त्यांना पुढील उपचारासाठी गडहिंग्लज उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. रात्री उशिरापर्यंत सर्वांवर उपचार सुरू होते. पिसाळलेल्या कुत्र्याला पकडण्यासाठी ग्रामस्थांसह प्रशासनाची शोधमोहीम उशिरापर्यंत सुरू होती.
दरम्यान, पिसाळलेल्या कुत्र्यानं चावा घेतल्यानंतर जखमींवर देण्यात येणारी “अँटी रॅबीज सिरम” लस कोवाड प्राथमिक आरोग्य केंद्रांत उपलब्ध नसल्यानं सर्व जखमींना थेट गडहिंग्लजला उपजिल्हा रुग्णालयात नेणं भाग पडलं.