रस्त्यावरील खड्ड्यांनी घेतला आणखी एक जीव; कागल अपघातात तरुण ठार

<p>रस्त्यावरील खड्ड्यांनी घेतला आणखी एक जीव; कागल अपघातात तरुण ठार</p>

कागल –  कागल-मुरगुड मार्गावर वड्डवाडी शेजारी झालेल्या भीषण अपघातात अजय प्रकाश वायदंडे (रा. पिंपळगाव खुर्द, ता. कागल) हा दुचाकीस्वार युवक जागीच ठार झाला. हा अपघात सोमवारी सकाळी घडला.

घटनास्थळावरून  मिळालेल्या माहितीनुसार, दहा चाकी दूध टँकर मुरगुडच्या दिशेने जात असताना अजय वायदंडे हा दुचाकीवरून पिंपळगावहून कागलकडे येत होता. वड्डवाडीच्या वळणावर भरधाव वेगाने जाणारा टँकर रस्त्यातील मोठा खड्डा चुकवण्याच्या प्रयत्नात दुचाकीवर जोरात आदळला. धडक इतकी जबर होती की दुचाकीचा पुढील भाग अक्षरशः चक्काचूर झाला. अजय गंभीर जखमी अवस्थेत रस्त्यावर पडला होता. त्याला तत्काळ कागल ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या अपघातानंतर काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. घटनास्थळी मोठी गर्दी जमली होती. अपघाताची नोंद कागल पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

दरम्यान, कागल-मुरगुड मार्गावरील मोठ्या खड्ड्यांमुळे सातत्याने अपघात होत आहेत. प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे हा दुर्दैवी अपघात घडल्याची संतप्त प्रतिक्रिया प्रवाशांकडून व्यक्त करण्यात आली.