चुकीच्या दिशेने आलेल्या टेम्पोच्या धडकेत भावंडांचा दुर्दैवी मृत्यू; दोघे गंभीर जखमी

<p>चुकीच्या दिशेने आलेल्या टेम्पोच्या धडकेत भावंडांचा दुर्दैवी मृत्यू; दोघे गंभीर जखमी</p>

कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी-कोल्हापूर मार्गावर कौलवजवळ आज सकाळी चुकीच्या दिशेने आलेल्या टेम्पोने दुचाकीला दिलेल्या जोरदार धडकेत दोघांचा दुर्दैवी मृत्यू झालाय. तर दोन जण गंभीर जखमी झालेत. अपघातात श्रीकांत बाबासो कांबळे (रा. तारासंबळे, ता. राधानगरी) आणि  दिपाली गुरुनाथ कांबळे (रा. शेंडूर, ता. कागल) यांचा जागीचं मृत्यू झालाय. तर अथर्व गुरुनाथ कांबळे (पुत्र दिपाली ) आणि कौशिकी सचिन कांबळे (पुतणी श्रीकांत ) हे गंभीर जखमी झाले आहेत. दोन्ही जखमींवर कोल्हापूर सीपीआर रुग्णालयात उपचार सुरूयेत.

श्रीकांत कांबळे हे त्यांची विवाहित बहिण दिपाली, तिचा मुलगा अथर्व व पुतणी कौशिकी यांना घेऊन भोगावती बाजारात गेले होते. बाजारहाट आटोपून ते दुचाकीवरून गावी परत जात असताना कौलव-शिरसे दरम्यान समोरून चुकीच्या दिशेने भरधाव वेगाने येणाऱ्या डंपरने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडकेत श्रीकांत आणि दिपाली यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर दोन लहान मुलं गंभीर जखमी झाली. या भीषण दुर्घटनेत वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. दरम्यान, स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल केलं. अपघातानंतर डंपरचा चालक वाहन टाकून घटनास्थळावरून फरार झालाय. अपघातानंतर परिसरात बघ्यांची मोठी गर्दी झाल्यानं काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. राधानगरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून टेम्पो आणि चालकाचा शोध सुरू आहे. या अपघातामुळे दिवाळीच्या आनंदात शोककळा पसरली आहे. भावंडांचा आणि लहान मुलांचा असा आकस्मिक मृत्यू झाल्यानं तरसंबळे व शेंडूर गावांमध्ये हळहळ व्यक्त केली जातीय.