वाघोबावाडी-आमशी दरीत भीषण अपघात; चारचाकी 300 फूट खोल दरीत कोसळली, पती-पत्नी गंभीर जखमी

कोल्हापूर – करवीर तालुक्यातील सातेरी येथून देवदर्शन करून पाचगावला परतणाऱ्या दत्तात्रय रघुनाथ पवार व अश्विनी दत्तात्रय पवार यांच्या ओमनी गाडीचा भीषण अपघात झाला. वाघोबावाडी ते आमशी दरम्यान मिठारीच्या दरीत ही गाडी तब्बल 300 फूट खोल कोसळली. या अपघातात दोघे पती-पत्नी गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. गाडी रात्री उशिरा घरी न परतल्यामुळे दत्तात्रय पवार यांचा मेहुणा अक्षय शिंदे यांनी करवीर पोलिस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती. आज पहाटे आमशी येथून वाघोबावाडीच्या दिशेने सरावासाठी गेलेल्या ॲकॅडमीच्या विद्यार्थ्यांना "वाचवा" असा आवाज दरीतून ऐकू आला. त्यांनी पाहणी केली असता ओमनी गाडी खोल दरीत कोसळलेली आढळून आली. दरीतून जखमींना वर आणणे कठीण होते, मात्र युवकांनी साखळी पद्धतीने मोठ्या धाडसाने त्यांना बाहेर काढून १०८ अॅम्बुलन्सच्या सहाय्याने रुग्णालयात रवाना केले.
या अपघाताची नोंद करवीर पोलिस ठाण्यात झाली असून, या मार्गावरील धोकादायक वळणे, रस्त्यावरील उखडलेली अवस्था आणि सुरक्षा कठड्यांचा अभाव ही गंभीर समस्या ठरत असल्याचे नागरिकांनी निदर्शनास आणले. या मार्गावर याआधीही दोन वेळा अपघात झाले आहेत. मात्र प्रशासन किंवा लोकप्रतिनिधी यांकडून कोणतीही पावले उचलली जात नाहीत. मतदानाच्या वेळी राजकारण्यांना गाव आठवतो, असा आरोप संतप्त ग्रामस्थांनी केला आहे.