फुलेवाडीत इमारतीचा स्लॅब कोसळला: एक ठार, पाच जण जखमी

कोल्हापूर - आज रात्री सुमारे दहा वाजण्याच्या सुमारास कोल्हापूरमधील फुलेवाडी फायर स्टेशनजवळ इमारतीचा स्लॅब कोसळून झालेल्या एका दुर्घटनेत ८ ते १० मजूर अडकले असल्याची भीती व्यक्त केली जातीय. या दुर्घटनेत नवनाथ आण्णाप्पा कागलकर (वय ३८, रा. शाहूनगर, वडवाडी) यांचा मृत्यू झाला असून, अक्षय पिराजी लाड (वय ३०, रा. शिवशक्ती कॉलनी, गंगाई लॉन), दत्तात्रय सुभाष शेंबडे (वय ३७),जया सुभाष शेंबडे (वय ५६, रा. संभाजीनगर), वनिता बापू गायकवाड (वय ४०, रा. संभाजीनगर), सुमन सदा वाघमारे (वय ६०, रा. संभाजीनगर) हे पाच जण जखमी झाले आहेत.
बचावकार्य जोरात सुरू असून अग्निशमन दल, आपत्ती व्यवस्थापन पथक, पोलीस, व मेडिकल टीम घटनास्थळी कार्यरत आहेत. पाऊस आणि अंधार यामुळे बचावकार्यात अडथळा निर्माण झाला असला तरी अडकलेल्यांना बाहेर काढण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत.
माजी आमदार ऋतुराज पाटील आणि माजी नगरसेवक राहुल माने यांनी घटनास्थळी तात्काळ धाव घेतली असून त्यांनी मदतकार्यात सक्रीय सहभाग घेतला आहे. शिवाय पोलीस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता, महापालिकेच्या आयुक्त के मंजूलक्ष्मी घटनास्थळी दाखल झालेत. संपूर्ण परिसरात तणावपूर्ण वातावरण असून बघ्यांची मोठी गर्दी जमली आहे. प्रशासनाने नागरिकांना शांतता राखण्याचे आणि मदतकार्यात अडथळा न आणण्याचे आवाहन केले आहे.
आयुक्त के. मंजूलक्ष्मी यांचे चौकशीचे आदेश -
दरम्यान, फुलेवाडी अग्निशमन केंद्र विकास व कर्मचारी निवासस्थान इमारतीचा स्लॅब टाकणेचे काम सुरु असताना स्लॅब कोसळण्याची दुर्घटना घडलीय.ही बाब अत्यंत गंभीर असून या इमारत बांधकामाचा दर्जा, गुणवत्तापूर्ण व दर्जेदार बांधकाम साहित्याचा वापर करणेत येत होता का?, स्लॅब टाकणेचे काम तांत्रिकदृष्ट्या हे योग्य होते का? याची सखोल चौकशी करणेसाठी अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ आणि शहर अभियंता रमेश मस्कर यांची द्विसदस्यीय समिती नेमून दोन दिवसांत अहवाल देण्याचे आदेश आयुक्त के मंजूलक्ष्मी यांनी दिलेत.