चंदगड तालुक्यात रानगव्याच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू – कुटुंबीयांना २५ लाखांचे आर्थिक सहाय्य

<p><strong>चंदगड तालुक्यात रानगव्याच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू – कुटुंबीयांना २५ लाखांचे आर्थिक सहाय्य</strong></p>

चंदगड - कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यातील कोकरे गावात रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी पुंडलिक बापू सुभेदार (वय ५६) यांचा दुर्दैवी मृत्यू झालाय. ही घटना १४ सप्टेंबर रोजी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास घडली. मयत सुभेदार हे रामेवाडी येथे आपल्या शेतमजुरांना चहा देण्यासाठी गेले असताना सरस्वती सिताराम सुतार यांच्या गट नं. २७ मधील ऊसातून अचानक एक रानगवा बाहेर आला. गव्याने केलेल्या हल्ल्यात पोटात शिंग घुसल्याने सुभेदार गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने चंदगड ग्रामीण रुग्णालयात, त्यानंतर गडहिंग्लज उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच परिक्षेत्र वन अधिकारी तुषार गायकवाड, वनपाल कृष्णा डेळेकर, चंद्रकांत पावसकर यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आणि कुटुंबीयांचे सांत्वन केले. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, शेतकऱ्यांच्या सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना राबवण्याची मागणी होत आहे.

१५ सप्टेंबर रोजी सहायक वनसंरक्षक विलास काळे यांनी कोकरे येथे भेट दिली. मृताची पत्नी अनिता सुभेदार यांना तत्काळ ५ लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला. तसेच, कोल्हापूरचे उपवनसंरक्षक धैर्यशील पाटील यांनी एकूण २५ लाख रुपयांची आर्थिक मदत मंजूर केल्याचे जाहीर केले. या प्रसंगी गावचे सरपंच, पोलीस पाटील, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शेतकऱ्यांना सतर्कतेचे आवाहन -

दरम्यान, शेतात वन्यप्राणी दिसल्यास तात्काळ वनविभागाशी संपर्क साधावा आणि शेतकाम करताना आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असं वनविभागाने शेतकऱ्यांना आवाहन केलंय.