राज्यात पुढील दोन दिवस अवकाळी पावसाचा अंदाज...
मुंबई - मागील दोन दिवसांपासून राज्याच्या अनेक भागांत तापमानाचा पारा घसरला असून, विशेषतः सायंकाळच्या वेळी हवेत सुखद गारवा अनुभवायला मिळतो आहे. राज्याच्या काही भागात दोन दिवस झालेल्या अवकाळी पावसामुळे कडाक्याच्या उन्हापासून नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला असला, तरी अवकाळी पावसाचे संकट अदयाप कायम आहे.
हवामान खात्याच्या अंदाजानुसार विदर्भ, मराठवाडा, खान्देश आणि मध्य महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये २० मार्चपर्यंत दुपारनंतर ढगाळ वातावरण निर्माण होऊन मेघगर्जनेसह वादळी पाऊस आणि काही ठिकाणी गारपीट होण्याचा अंदाज आहे. १८ ते २० मार्च दरम्यान वादळी पावसाची तीव्रता आणि क्षेत्र वाढण्याची शक्यता आहे. या काळात विदर्भ, मराठवाडा, खानदेश आणि मध्य महाराष्ट्रात ठिकठिकाणी ढगाळ वातावरणासह वादळी पावसाची शक्यता आहे. २१ मार्चपासून हवामान स्थिर होईल, असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.