फुटबॉल सामन्यातील अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करा
लोककल्याण फाऊंडेशनची मागणी
कोल्हापूर – शहरात चार महिने शाहू स्टेडियमवर फुटबॉलचे सामने होतात. क्रीडा रसिक हे सामने पाहण्यासाठी मोठ्या संख्येने हजेरी लावतात. मात्र गेल्या दहा वर्षापासून कोल्हापुरातील फुटबॉलला अनुचित वळण लागले आहे. संघांमधील तीव्र ईर्षा राजकीय वरदहस्तामुळे दिवसेंदिवस वाढत चाललीय. अनेक सामन्यांत खेळाडू आपापसात हाणामारी करतात. मैदानातच त्यांच्या संघाचे पाठीराखे बेभान होऊन अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करतात. सामना सुरू असताना खेळाडूचे समर्थक मैदानात घुसतात आणि गोंधळ घालतात. या अनुचित प्रकारामुळे खेळाचा आनंद लुटण्यासाठी मैदानात आलेल्या फुटबॉल शौकिनांना त्रास सहन करावा लागतो. यंदाचा फुटबॉल हंगाम उद्या सोमवारपासून सुरू होतोय. त्यामुळे फुटबॉल हंगामात मैदान आणि मैदानाबाहेर होणारे अनुचित प्रकार टाळण्यासाठी कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करावा, मैदानावर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची संख्या वाढवावी, प्रेक्षक गॅलरीत प्रत्येक सेक्शनमध्ये दोन पोलिसांची नियुक्ती करावी, सामना चालू असताना गोंधळ घालणाऱ्या प्रेक्षकांना त्वरीत ताब्यात घेऊन त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करावी, आदि मागण्या लोक कल्याण फाउंडेशनने केल्या आहेत.
फाऊंडेशनच्यावतीने जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे निरीक्षक किरण लोंढे यांना या मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यावेळी फाउंडेशनचे अध्यक्ष सुहास साळोखे, चंद्रकांत यादव, शलील देसाई, अनिल चव्हाण, राजाभाऊ मालेकर, सीएम गायकवाड, सुनील जाधव, जगन्नाथ सूर्यवंशी आदी उपस्थित होते.